
नवी मुंबई प्रतिनिधी
कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत पीडित व्यक्तीला नेहमीच मदतीची गरज भासत असते.
हे लक्षात घेऊन ११२ ही आपत्कालीन हेल्पलाइन सुविधा सुरू करण्यात आली. त्यावर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीला तत्काळ मदत पोचविण्यासाठी नवी मुंबई पोलिस तत्पर आहेत. ‘तुमची सुरक्षा, आमची जबाबदारी’ हे ध्येय मानून नवी मुंबई पोलिस दल सतर्क आणि कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे.
डायल ११२ या प्रणालीमध्ये २०२४ मध्ये ९८ हजार ७६७ कॉल्स रिसीव्ह झाले असून, सरासरी प्रतिसाद वेळ ५.४७ इतका आहे. २०२३मध्ये सरासरी प्रतिसाद वेळ ८.०२ मिनिटे इतका होता. त्यामध्ये साधारण २.५५ मिनिटे इतकी सुधारणा झालेली आहे.
अत्यावश्यक सेवांसाठी राज्य सरकारच्या पोलिस खात्याच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही सेवा नवी मुंबईमधील नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांसाठीही वरदान ठरत आहे. मारामारी, अपघात, आग, चोरी, छेडछाड, रस्ता चुकणे, शारीरिक छळ, बेकायदा व्यवसाय, रात्रीच्या वेळी महिला व तरुणींना मदत आणि रुग्णवाहिका अशा प्रकारच्या अत्यावश्यक सेवा मिळत आहेत.
यामुळे नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत महिनाभरात सरासरी आठ हजार ते साडेआठ हजार नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यामार्फत अनेक जणांना अत्यावश्यक वेळी सेवा मिळाल्या आहेत; तर काहींचे प्राणही वाचले आहेत.
अशी मिळते मदत
एखाद्या व्यक्तीने ११२ क्रमांकावर फोन करून मदत मागितल्यास नियंत्रण कक्षातून त्यास प्रथम प्रतिसाद दिला जातो.
त्यानंतर संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा (लोकेशन) तपासून तो फोन तत्काळ संबंधित शहराच्या पोलिस नियंत्रण कक्षाला जोडला जातो.
आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील संगणकीय यंत्रणेवर त्याबाबत माहिती दिसून येते.
त्यानंतर कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणाजवळ असलेल्या वाहनास संपर्क साधला जातो.
वाहनांवरील कर्मचारी कॉल प्राप्त होताच त्याला तत्काळ मदत पोहोचवतात.
मदतीसाठी कॉल आल्यानंतरचा प्रतिसाद देण्याचा कालावधी कमी झाला आहे. २०२३ मध्ये सरासरी प्रतिसाद वेळ ८.०२ मिनिट इतका होता; तर २०२४मध्ये सरासरी प्रतिसाद वेळ ५.४७ इतका झाला आहे. त्यामध्ये साधारण २.५५ मिनिटे इतकी सुधारणा झालेली आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
अशी आहे सुविधा
पोलिस, अग्निशमन, आरोग्य मदत
* महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी एकच क्रमांक
* कॉल करणाऱ्याचे लोकेशन तत्काळ समजते
* पीडित व्यक्तीला तातडीने प्रतिसाद व मदत
* फेक कॉल करणारे लवकर निष्पन्न