मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील विभागप्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती. त्यानंतर लगेचच मुंबईतील पक्षसंघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या राज्यासह देशाच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू आहेत. निवडणूक प्रक्रिया, मतदार याद्यांशी संबंधित प्रश्न तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांची बैठक बोलावल्याचे मानले जात आहे.
मुंबई ही शिवसेनेच्या राजकारणाची पारंपरिक ताकद राहिली आहे. त्यामुळे आगामी राजकीय आणि संघटनात्मक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विभागनिहाय परिस्थिती, पदाधिकाऱ्यांची सक्रियता, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि पक्षाच्या पुढील कार्यक्रमांबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.


