ठाणे प्रतिनिधी
ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तपासाला मोठी कलाटणी मिळाली आहे. पूर्णेकर यांचा जवळचा मित्र असलेल्या पप्या शिंदेचा हत्येच्या कटात सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य चार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
२९ सप्टेंबर रोजी रात्री मानपाडा परिसरातील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर बसले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रानेही वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत पूर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
मित्रच संशयाच्या भोवऱ्यात
पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे नातेवाईक मंदार घोडके यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास घोडके हे राहुल जैस्वाल यांच्यासोबत पूर्णेकर यांच्या कार्यालयात होते. त्याचवेळी पप्या शिंदे तेथे आला. त्यानंतर पूर्णेकर आणि शिंदे यांनी दोघांना कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले.
घोडके आणि जैस्वाल कार्यालयाबाहेर आल्यानंतर काही संशयित व्यक्ती परिसरात आल्याचे त्यांनी पाहिले. त्यामध्ये संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव उर्फ शूटर यादव यांच्यासह चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधलेली आणि हेल्मेट घातलेली व्यक्ती असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही वेळाने कार्यालयातून गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
रक्ताने माखलेले कपडे अन् रुग्णालयातही उपस्थिती
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर घोडके आणि जैस्वाल कार्यालयात गेले असता प्रदीप पूर्णेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यावेळी पप्या शिंदे त्यांच्या जवळच होता आणि त्याच्या कपड्यांवर रक्त लागले असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
पूर्णेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्यानंतरही पप्या शिंदे तेथे पोहोचला. मात्र, त्याच्या अंगावर हल्ल्यात झालेल्या कोणत्याही जखमा दिसत नसल्याने पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पुरावे आणि तक्रारीतील आरोपांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी
प्रदीप पूर्णेकर आणि पप्या शिंदे हे पूर्वी मित्र होते. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये मतभेद झाल्याने ते एकमेकांपासून दूर झाले होते. काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे सांगितले जाते. पप्या शिंदेविरोधात यापूर्वीही मारामारीचे गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अन्य चार आरोपींचा शोध
या हत्येच्या कटात पप्या शिंदेसह एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी आता उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाला वेग दिला आहे. ठाण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आहे.


