मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर सोशल मीडिया पोस्टद्वारे जोरदार टीका केली आहे. मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणीची (SIR) प्रक्रिया रद्द करून तिची निष्पक्ष चौकशी करावी आणि नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आगामी काळातील सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदविल्याचा दाखला देत सत्ताधाऱ्यांकडून ज्ञानेश कुमार यांचा वापर केला जात असल्याची टीका केली. गेल्या दोन दिवसांपासून ज्ञानेश कुमार शांत असल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या व्यक्तींना हाताशी धरून भाजप सत्तेत दीर्घकाळ राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. त्यासाठी २०२५ पासून SIR हे नवे अस्त्र वापरले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
SIR प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे सांगत राज ठाकरे यांनी ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. या विषयावर देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट असून, सध्याची SIR प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून त्यातील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करावी आणि त्यानंतर नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
याचबरोबर पुढील सर्व निवडणुका मतदान यंत्रांवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे आंदोलन उभारावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. या आंदोलनातून सत्तेच्या राजकारणामागील वास्तव समोर येईल, असा दावा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.


