मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज, २५ सप्टेंबरला मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजल्यापासून २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत विसर्जन मार्गांवर वाहतूक निर्बंध, रस्ते बंद, वळविणे आणि नो-पार्किंगची अंमलबजावणी केली जाणार आहे.
दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक प्रमुख मार्गांवर निर्बंध
कुलाबा, मरीन ड्राइव्ह, काळबादेवी, गिरगाव, पायधुनी आणि ताडदेव परिसरातील विसर्जन मार्गांवर मिरवणुकीच्या वेळेनुसार वाहतूक बंद अथवा वळविण्यात येणार आहे. दादरमधील वीर सावरकर मार्ग आणि टिळक उड्डाणपूल यांच्यावरही वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. भायखळा, भोईवाडा आणि वरळी परिसरातही मिरवणुकांमुळे काही रस्त्यांवर वाहतूक बंद तसेच नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे.
उपनगरांतही वाहतुकीवर निर्बंध
जुहू, अंधेरी, मालाड आणि मुलुंड या भागांमध्ये विसर्जन मिरवणुका आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काही रस्ते बंद, वाहतूक वळविणे आणि पार्किंगवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागांतून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो विसर्जन मार्ग टाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
जेव्हीएलआरवर अवजड वाहनांना बंदी
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) वरील दोन्ही दिशांच्या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही बंदी २५ सप्टेंबर सकाळी १० वाजल्यापासून २६ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाकडून येणाऱ्या अवजड वाहनांनी पूर्व द्रुतगती महामार्गाचा, तर पश्चिम द्रुतगती महामार्गाकडून येणाऱ्या वाहनांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
उत्तर-दक्षिण प्रवासासाठी हे मार्ग सुरू
दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विसर्जनाच्या प्रमुख मिरवणूक मार्गांऐवजी मुंबई कोस्टल रोडचा शक्य तितका वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी सूचित केले आहे. त्याचबरोबर ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतू हेही पर्यायी मार्ग म्हणून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२४ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त
गणेश विसर्जन सुरळीत आणि सुरक्षित पार पडावे यासाठी मुंबईत २४ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबत रॅपिड ॲक्शन फोर्स, राज्य राखीव पोलीस दल, फोर्स वन आणि अँटी-ड्रोन पथकांचीही मदत घेतली जाणार आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना अनावश्यकपणे विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरून प्रवास न करण्याचे, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावरही अनंत चतुर्दशीसाठी स्वतंत्र वाहतूक व सुरक्षा सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.


