कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जनानंतर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली असून, त्याचा थेट परिणाम खासगी आराम बसच्या तिकीट दरावर झाला आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील खासगी आराम बसेसचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले असून, रविवारी काही बसचे तिकीट दर तब्बल २७०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र होते.
गणेशोत्सवासाठी मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने नोकरदार आणि व्यावसायिक कोल्हापुरात आले होते. घरगुती गणपती विसर्जनानंतर आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रविवारची सुटी असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आणि त्याचा परिणाम खासगी बसच्या तिकीट दरावर झाला.
सामान्य दिवसांत कोल्हापूर-मुंबई खासगी आराम बसचे भाडे साधारण ७५० ते ८०० रुपयांच्या आसपास असते. मात्र, प्रवाशांची वाढलेली मागणी आणि मर्यादित उपलब्धता यामुळे रविवारी काही प्रवाशांना २७०० रुपये मोजावे लागल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सोमवारपासून तिकीट दर दोन हजार रुपयांच्या खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ५५० खासगी आराम बसेस आहेत. त्यापैकी मुंबई मार्गावर थेट धावणाऱ्या बसेसची संख्या अंदाजे २५ ते ३० आहे. याशिवाय गोवा, बंगळुरू आणि गडहिंग्लज मार्गावरून कोल्हापुरात येणाऱ्या बसेसही मुंबईकडे प्रवासी घेऊन जातात.
दरम्यान, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसने कोल्हापूर ते मुंबई प्रवासासाठी सुमारे ९१० रुपये तिकीट दर आहे. त्यामुळे खासगी बसच्या वाढलेल्या दरामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
खासगी आराम बसच्या भाड्याबाबत नियम असून, एसटीच्या तिकीट दराच्या दीडपटपेक्षा अधिक भाडे आकारण्यास बंदी आहे. यासंदर्भात अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालकावर कारवाई केली जाईल, असे कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.
गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी होत असल्याने पुढील काही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावरील बससेवेवर प्रवाशांचा ताण कायम राहण्याची शक्यता आहे.

