कोल्हपूर प्रतिनिधी
कोल्हापूर : ‘आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या,’ अशी आर्त मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण अखेर नांदणीत परतली. गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये देखभाल केल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माधुरीला तिच्या जुन्या ठिकाणी आणण्यात आले. तब्बल ४८ तासांचा प्रवास करत मुंबई आणि पुणेमार्गे माधुरी रात्री उशिरा नांदणीत दाखल झाली. तिच्या आगमनाची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले. माधुरीच्या स्वागतासाठी गावात आधीपासूनच उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. तसेच वनतारा रेस्क्यू सेंटरचे संस्थापक अनंत अंबानी यांचे आभार मानणारे फलकही लावण्यात आले होते. माधुरी नांदणीत दाखल होताच कोल्हापूरकरांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.
माधुरीच्या पुनर्वसनासाठी नांदणीत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तिच्या आरोग्याची काळजी घेत मोकळे वातावरण, मऊ वाळू, विशेष फ्लोअरिंग, पाण्यात व्यायाम करण्यासाठी जलाशय तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हत्तीच्या आरोग्यासाठी केवळ अन्न आणि निवारा पुरेसा नसतो. पाय व सांध्यांची नियमित तपासणी, आरोग्याचे सातत्याने निरीक्षण आणि गरजेनुसार उपचार आवश्यक असतात. त्यामुळे माधुरीच्या देखभालीसाठी आधुनिक उपचारपद्धती आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
माधुरीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वनताराकडूनही आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे. वनताराच्या सहकार्यामुळे माधुरी पुन्हा नांदणीत परतत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही वनताराच्या भूमिकेचे कौतुक केले असून, नांदणीत ‘मिनी वनतारा’ उभारल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, माधुरीच्या देखभालीसाठी उच्चस्तरीय समितीने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. माधुरीचा मिरवणूक, परेड, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन अथवा भीक मागण्यासाठी वापर करता येणार नाही. तसेच १८ वर्षांखालील मुलांना आणि प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तींना तिच्याशी शारीरिक संपर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. वन्यजीव कायदे तसेच तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
माधुरी ही कोल्हापूरकरांसाठी केवळ हत्तीण नसून नांदणीशी जोडलेले भावनिक नाते आहे. त्यामुळे तिची झालेली घरवापसी हा कोल्हापूरकरांसाठी आनंदाचा आणि भावनिक क्षण ठरला. तब्बल ४८ तासांचा प्रवास करून माधुरी पुन्हा आपल्या माणसांमध्ये परतल्याने नांदणीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

