
मुंबई : मोबाईल युगात अनेकजण मोबाईलच्या आहारी गेले आहेत. मोठ्यांचे पाहून लहान मुलेही अनुकरण करायला लागली आहेत. हल्लीच्या मुलांचा निरागसपणा मोबाईल फोनने हिरावून घेतला आहे. मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलं मोबाईलमध्ये वेळ घालवताना दिसतात.
यामुळे लहान मुलांच्या मनावर परिणाम होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, आईने मोबाईल फोन वापरणाऱ्या आपल्या अल्पवयीन मुलाला रागावून अभ्यासाला बसवले. यानंतर मुलगा इतका संतापला की त्याने आईच्या डोक्यावर बॅटने वार केले. त्याच्या एका हल्याने आई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. आश्चर्य म्हणजे आपण काही चुकीचे केले नाही ही भावना त्या मुलाच्या मनात नव्हती. त्याने आईला बेशुद्ध करून पुन्हा मोबाईल वापरायला सुरुवात केली. घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये मुलाचे संपूर्ण कृत्य कैद झाले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संबंधित व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. मोबाईलच्या या व्यसनाला ‘नोमोफोबिया’ म्हणतात. म्हणजे मोबाईल नसण्याची भीती. भारतातील 4 पैकी 3 लोक नोमोफोबियाने ग्रस्त आहेत. अशा लोकांची इंटरनेट किंवा मोबाईलची बॅटरी संपली तर त्यांना काळजी वाटते. यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.