अलिबाग प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीचे विघ्न यंदाही कायम राहिले आहे. शनिवारी कोलाड ते इंदापूरदरम्यान तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना दोन ते तीन तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागले. महामार्गाचे अपूर्ण काम, नागोठणे परिसरातील खड्डे, इंदापूरमधील सिंगल लेन आणि वाहनचालकांकडून होणारी राँग साइडची वाहतूक यामुळे कोंडीत आणखी भर पडली.
शनिवारी सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. खारपाड्यापासूनच वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक झाली. वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांनाही मर्यादा आल्या.
इंदापूर-माणगाव पट्ट्यातही कोंडी
इंदापूर-माणगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडी कायम राहिली. या मार्गावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः इंदापूर ते माणगावदरम्यान वाहनांचा वेग अत्यंत मंदावला. या कोंडीचा फटका स्थानिक नागरिकांसह एसटी बस, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा आणि व्यावसायिकांनाही बसला.
दरम्यान, मुंबई-पुणे मार्गावरही मोठी गर्दी झाली होती. अनेक वाहनचालकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून खालापूर टोलनाका आणि तेथून पाली फाट्यावरून पालीमार्गे मुंबई-गोवा महामार्गावर जाण्याचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे या मार्गावरही वाहनांची संख्या वाढली.
गेल्यावर्षीचीच समस्या यंदाही कायम
गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात अपूर्ण महामार्गाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. यंदा महामार्गाचे काम पूर्ण होऊन प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र नागोठणे येथील खड्डे आणि इंदापूरमधील सिंगल लेनची समस्या कायम असल्याने परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यातच काही वाहनचालक राँग साइडने वाहने घुसवत असल्याने एकाच ठिकाणी तीन-चार रांगा तयार होऊन कोंडी अधिकच तीव्र होत आहे.
दोन दिवसांत ३०,६६१ वाहने कोकणात
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत १४,८४० वाहने, तर १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून दुपारी २ वाजेपर्यंत १७,७७१ वाहने कोकणाच्या दिशेने गेली. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोन दिवसांत एकूण ३०,६६१ वाहने कोकणात दाखल झाली.
दरम्यान, वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी राँग साइडने वाहने चालवू नयेत आणि शिस्त पाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. “बेशिस्त वाहनचालकांमुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राँग साइडने वाहने टाकून वाहतूककोंडीला अडथळा करू नका,” असे पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांनी सांगितले.

