मुंबई प्रतिनिधी
भाईंदर : गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाण्यासाठी शनिवारी सकाळपासून मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर उतरल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. चेना पूल ते ओवळा या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना तब्बल एक ते दीड तास कोंडीत अडकून पडावे लागले. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचेही हाल झाले.
सोमवारी गणेशोत्सव असल्याने मीरा-भाईंदर, वसई-विरार तसेच मुंबई परिसरातील नागरिकांनी शनिवारपासूनच कोकणाकडे जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे घोडबंदर मार्गावर सकाळपासूनच वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. घोडबंदरचा अरुंद घाटमार्ग आणि त्यात वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना मोठा कालावधी लागल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यात गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची भर पडल्याने शनिवारी वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला. खासगी वाहनांसह परिवहन सेवेच्या बसगाड्याही वाहतूक कोंडीत अडकल्या. त्यामुळे बसमधील प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, घोडबंदर मार्गावरील खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात येणार होते. मात्र, या मार्गावरील वाहनांची मोठी रहदारी लक्षात घेता हे काम पुढे ढकलण्यात आले आहे. अरुंद मार्ग, खड्डे आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस या मार्गावर वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी शक्य असल्यास मुंबईच्या मार्गाचा पर्याय वापरावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

