मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांचा बुधवारी (९ सप्टेंबर) शपथविधी पार पडला. लोकभवन, मुंबई येथे झालेल्या छोटेखानी समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी न्यायमूर्ती त्रिपाठी यांना पदाची शपथ दिली.
शपथविधीनंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी न्यायमूर्ती त्रिपाठी यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना आणि अधिपत्र वाचून दाखविले.
राष्ट्रगान, वंदेमातरम आणि राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीत न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. वंदेमातरम आणि राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.
या समारंभास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती सचिन अहिर, मंत्री छगन भुजबळ, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयातील तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती मोहित शाह यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही या समारंभास उपस्थिती लावली.
न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाचे पद रिक्त झाले होते. या पदाचा अतिरिक्त कार्यभार न्यायमूर्ती रवींद्र घुगे सांभाळत होते. आता न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुख्य न्यायमूर्तीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

