पुणे प्रतिनिधी
पुणे : दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील गाण्यांवर नृत्य तसेच आक्षेपार्ह हावभाव केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह आठ नृत्यांगनांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित दहीहंडी मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सवादरम्यान पुण्यासह मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये अश्लील गाणी वाजवून आक्षेपार्ह नृत्य आणि हावभाव करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच पोलिसांनी संबंधित कार्यक्रमांची दखल घेत कारवाई सुरू केली.
पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमातील नृत्यप्रकारावरून यापूर्वी नृत्यांगना राधा पाटील हिच्यावरही पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर आता सहकारनगर पोलिसांनी निशा मुंबईकर, शुभांगी थोरात यांच्यासह अन्य आठ नृत्यांगनांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी केवळ नृत्यांगनांवरच कारवाई न करता संबंधित दहीहंडी मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनाही सहआरोपी केले आहे. कार्यक्रमासाठी संबंधित मंडळांनी आवश्यक परवानगी घेतली होती का, परवानगी देताना घालून दिलेल्या अटींचे पालन करण्यात आले का, तसेच आक्षेपार्ह गाणी आणि नृत्यप्रकार सादर करण्यास आयोजकांची संमती होती का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणी अश्लील गाणी वाजवणे, आक्षेपार्ह नृत्य सादर करणे, सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे तसेच परवानगीतील अटींचा भंग करून कार्यक्रम घेणे, या विविध बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.

