मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महापालिका क्षेत्रातील दृष्टिहीन तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना ‘बेस्ट’च्या साध्या विना-वातानुकूलित बसमधून 100 टक्के मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. या मोफत प्रवासाच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी महापालिकेकडून बेस्ट उपक्रमाला 7 कोटी 64 लाख 55 हजार 170 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी या खर्चाला मंजुरी दिली असून, अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.
दिव्यांग व्यक्तींना समान संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या अंदाजपत्रकातील किमान पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरी वाहतूक व्यवस्थेत दिव्यांगांना विविध सवलती देण्यात येतात. त्यानुसार बेस्टच्या साध्या बसमधून दृष्टिहीन आणि 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते.
बेस्ट उपक्रमाने मागील आर्थिक वर्षात दिव्यांग प्रवाशांना देण्यात आलेल्या मोफत प्रवासापोटी झालेल्या खर्चाची 7 कोटी 64 लाख 55 हजार 170 रुपयांची देयके महापालिकेकडे प्रतिपूर्तीसाठी सादर केली होती. ही रक्कम महिला व बालकल्याण विभागाच्या अंदाजपत्रकातील उपलब्ध पाच कोटी रुपयांच्या निधीतून भागविण्यात येणार आहे. उर्वरित 2 कोटी 64 लाख 55 हजार 170 रुपयांची तूट भरून काढण्यासाठी नियोजन विभागाच्या इतर लेखाशीर्षातून निधीचे पुनर्वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षातही महापालिकेने बेस्टला 4 कोटी 88 लाख 4 हजार 983 रुपयांचे अनुदान मंजूर केले होते.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी बेस्टकडून यंदाही रात्रीच्या वेळी जादा बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी आदी प्रमुख गणेशोत्सव परिसरांवर लक्ष केंद्रित करून 14 ते 24 सप्टेंबरदरम्यान 10 बसमार्गांवर संपूर्ण रात्रभर 26 जादा बसगाड्या धावणार आहेत. रात्री साडेदहा ते सकाळी सहा या वेळेत ही सेवा सुरू राहणार आहे. ओशिवरा, शिवाजीनगर, देवनार, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, सांताक्रुझ, वडाळा आणि काळा किल्ला या आगारांमार्फत जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरातील ओशिवरा आणि सांताक्रुझपर्यंतही गणेशभक्तांसाठी ही अतिरिक्त बससेवा उपलब्ध राहणार आहे.

