मुंबई प्रतिनिधी
दहीहंडीचा उत्साह, बाळगोपाळांचा कलकलाट आणि सणाचा आनंद… मात्र अवघ्या काही क्षणांत हा आनंद काळीज पिळवटून टाकणाऱ्या शोकांतिकेत बदलला. मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात मुलांनी स्वतःहून आयोजित केलेली दहीहंडी सात वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतली. हंडी फोडताना दोरीला आधार देणारा विटांचा खांब कोसळून रुद्र कदम या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने मालवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुलांनी स्वतःच आखला होता दहीहंडीचा बेत
मालाडमधील चिकुवाडी, मार्वे रोड परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. परिसरात खेळणाऱ्या काही मुलांनी उत्साहात स्वतःच दहीहंडी साजरी करण्याचे ठरवले. त्यासाठी एका बाजूला झाडाला, तर दुसऱ्या बाजूला इमारतीच्या तळमजल्यावरील विटांच्या खांबाला दोरी बांधण्यात आली होती.
सणाचा उत्साह सुरू असतानाच हंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हंडीला बांधलेली दोरी तोडण्याच्या प्रयत्नादरम्यान विटांचा कच्चा खांब अचानक कोसळला.
खांब थेट डोक्यावर कोसळला
खांब कोसळताच तो जवळच उभ्या असलेल्या सात वर्षांच्या रुद्र कदम याच्या अंगावर पडला. खांबाचा गंभीर आघात डोक्याला झाल्याने रुद्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थित मुलांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
जखमी रुद्रला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
चिमुकल्याच्या मृत्यूने मालवणी सुन्न
अवघ्या सात वर्षांच्या रुद्रच्या मृत्यूची बातमी परिसरात पसरताच मालवणीवर शोककळा पसरली. काही वेळापूर्वी दहीहंडीच्या उत्साहात सहभागी झालेल्या चिमुकल्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासन घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच वॉर्ड नियंत्रण कक्ष, महापालिका कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेची पुढील चौकशी सुरू असून, नेमक्या परिस्थितीचा तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, सण-उत्सव साजरे करताना लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष किती गंभीर परिणाम घडवू शकते, याची जाणीव करून देणारी ही दुर्दैवी घटना ठरली आहे. रुद्रच्या अकाली मृत्यूने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त केले जात आहे.

