मुंबई प्रतिनिधी
मुंबई : म्हाडामध्ये अधिकारी असल्याचे भासवून कमी किमतीत राखीव सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिघांकडून तब्बल २७ लाख २५ हजार रुपये उकळल्याचा प्रकार गोरेगावमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी नितीन चव्हाण आणि त्याची पत्नी दर्शना चव्हाण यांच्याविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात २ सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव पश्चिम येथे राहणारे सुनील लोखंडे यांची शेजाऱ्याच्या माध्यमातून चव्हाण दाम्पत्याशी ओळख झाली होती. नितीन चव्हाण हा म्हाडामध्ये अधिकारी असल्याचे सांगत राखीव सदनिका मिळवून देण्याचे त्याने लोखंडे यांना आमिष दाखविले. पहाडी गोरेगाव येथील म्हाडाच्या सदनिका दाखवून तीन महिन्यांत सदनिका नोंदणी करून नावावर करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपये रोख द्यावे लागतील, असे सांगण्यात आले.
घर मिळण्याच्या आशेने लोखंडे यांनी सुरुवातीला चव्हाण दाम्पत्याला ८ लाख १८ हजार ५०० रुपये रोख दिले. त्यानंतर एक लाख ५६ हजार ५०० रुपये ऑनलाइन पाठविले. अशा प्रकारे लोखंडे यांच्याकडून एकूण ९ लाख ७५ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय संगिता अडुळकर यांच्याकडून ९ लाख ५० हजार रुपये, तर माया घोडके यांच्याकडून ८ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
पैसे घेतल्यानंतर लोखंडे यांच्या नावावरील म्हाडाचे गाळा वितरण पत्र, ताबापत्र, ताबापावती, अंडरटेकिंग, म्हाडात ५६ हजार ८०० रुपये भरल्याची पावती, बायोमेट्रिक्स तसेच कर्ज प्रक्रियेसाठीचे निमंत्रण पत्र अशा विविध कागदपत्रांच्या प्रती देण्यात आल्या. मात्र, ठरलेल्या मुदतीत सदनिकेचा ताबा किंवा नोंदणी करून देण्यात आली नाही. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे समोर आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लोखंडे यांच्या लक्षात आले.
दरम्यान, तिघांकडून मिळून २७ लाख २५ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. २६ मे रोजी नितीन चव्हाण याने तक्रारदार आणि अन्य दोघांच्या उपस्थितीत पैसे घेतल्याची कबुली देत २१ जून रोजी संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत पैसे परत न केल्याने अखेर लोखंडे यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी नितीन चव्हाण आणि दर्शना चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

