मुंबई प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. ५० टक्के प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बाळगण्याची सक्ती तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे NCMC कार्ड नसले तरी महिला आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
शासन निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी बसमधून प्रवास करताना NCMC कार्डची सक्ती करण्यात आली असून, कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जात असल्याची बाब निदर्शनास आली.
ऐन गौरी-गणपती उत्सवाच्या काळात भाविक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2026
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील महिलांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही एसटीच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते.
मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अलीकडे NCMC कार्डची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे कार्ड नसलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून पूर्ण तिकीट आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. १ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्डची व्यवस्था करण्याची मुदत देण्यात आली होती.
गौरी-गणपती उत्सवात गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी महत्त्वाची घोषणा केली. गौरी-गणपती उत्सवाच्या काळात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी NCMC कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
शेलार यांनी सांगितले की, शासन निर्णयानुसार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून प्रवास करताना NCMC कार्डची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, कार्ड नसल्यास संबंधित प्रवाशांकडून पूर्ण तिकीट आकारले जात असल्याचे निदर्शनास आले. उत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून NCMC कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
परिवहन विभागाच्या निर्णयावर पुन्हा चर्चा
दरम्यान, आशिष शेलार यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. परिवहन विभागाची जबाबदारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे असताना शेलार यांनी NCMC कार्डसंदर्भातील निर्णय जाहीर करण्यापूर्वी परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली होती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरही परिवहन विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयातील निर्णयांमध्ये फरक दिसून आला होता. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात वाढ करून एक वर्षाची मुदत दिली होती. त्यानंतर आता NCMC कार्डच्या सक्तीबाबतही परिवहन विभागाच्या निर्णयावर फेरविचार करण्याची घोषणा झाल्याने महायुतीतील समन्वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मात्र, सध्या गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर NCMC कार्ड नसलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार असल्याने एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

