नाशिक प्रतिनिधी
नाशिक (दिंडोरी) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथे आश्रमशाळेत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हरिदास अंबादास शेखरे या विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे दिंडोरी परिसरासह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरिदास याने शाळेतील एका विद्यार्थिनीला चिठ्ठी दिली होती. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याला मुख्याध्यापिकांच्या कार्यालयात बोलावून याबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर हरिदास मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच हरिदासच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी संबंधित प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नातेवाइकांशी संवाद साधला. दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्यानंतर परिस्थिती शांत झाली.
दरम्यान, हरिदासचा मृतदेह पिंपळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पथक करत आहे. विद्यार्थ्याने नेमक्या कोणत्या मानसिक अवस्थेत हे पाऊल उचलले, तसेच या प्रकरणात कोणाची काही भूमिका होती का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

