नाशिक प्रतिनिधी
नाशिक : केवळ पदवीधरांची संख्या वाढविण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योग आणि स्टार्टअपमध्ये रूपांतरित करणारी सक्षम परिसंस्था विद्यापीठांनी निर्माण करावी. विद्यापीठांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग, नवोन्मेष आणि युनिकॉर्न निर्माण झाले पाहिजेत. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या शिवनई (ता. दिंडोरी) येथील नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार भास्कर भगरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जागतिकीकरणानंतर अर्थव्यवस्थेचे स्वरूप वेगाने बदलत असून शिक्षण, रोजगार आणि सेवा क्षेत्र एकमेकांपासून वेगळे ठेवता येणार नाहीत. त्यामुळे केवळ पदवीधारक तयार करण्याऐवजी रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण अधिक रोजगाराभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समुळे रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. भविष्यात अनेक पारंपरिक रोजगारांमध्ये बदल होणार असून त्याचवेळी नव्या संधीही निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारासाठी तयार करण्यावर विद्यापीठांनी भर द्यावा. नाशिक उपकेंद्राने डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिकच्या विकासाला नवी गती
नाशिकच्या विकासक्षमतेचा उल्लेख करताना फडणवीस यांनी कृषी, विशेषतः द्राक्ष उत्पादन व निर्यात, अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी सेवा, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स, लाइफ सायन्सेस आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील संधींचा उल्लेख केला. गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये विविध उत्पादन व औद्योगिक क्षेत्रांत सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, पुणे आणि नाशिक हा महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा त्रिकोण आहे. काही काळ नाशिकच्या औद्योगिक विकासाची गती मंदावली होती; मात्र आता नाशिक पुन्हा वेगाने पुढे जात आहे. पुढील पाच वर्षांत मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्राचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून उदयास येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून दर्जेदार आणि रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल. आधुनिक शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देत नाशिकच्या विकासाला या केंद्रातून नवी दिशा मिळेल. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा प्रभावी वापर करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
१८ कोटींचा खर्च; अडीच लाख विद्यार्थ्यांना लाभ
शिवनई येथे नाशिक उपकेंद्रासाठी ६२ एकर जागा उपलब्ध झाली असून, त्यापैकी ४० एकर जागा सध्या उपकेंद्राच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे. नूतन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ ३३ हजार चौरस फूट असून इमारत, फर्निचर, संगणक आणि अन्य सुविधांसाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यासह दादरा-नगर हवेली आणि सिल्व्हासा हा उपकेंद्राचा कार्यक्षेत्रात समावेश आहे. उपकेंद्रांतर्गत १९६ महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था, सुमारे २ हजार ६०० शिक्षक आणि अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. दोन संशोधन केंद्रे कार्यरत असून एमबीए, बीबीए, मंदिर व्यवस्थापन आणि कार्यकारी एमबीए यांसारखे अभ्यासक्रम सुरू आहेत.
उपकेंद्रात ई-लायब्ररी, संगणक प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, सभागृह, विद्यार्थी सुविधा केंद्र तसेच रोजगार व प्रशिक्षण केंद्राच्या सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचे स्थानांतरण व स्थलांतर प्रमाणपत्र, परीक्षा प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींचे निराकरण यांसारख्या सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन केंद्रांचा विस्तार
नाशिक उपकेंद्राला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. तंत्रज्ञान आणि विधी विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच विविध विषयांसाठी संशोधन केंद्रे आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपकेंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील, असे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असून विद्यार्थ्यांच्या समुपदेशनावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक उपकेंद्राचा सर्वसामान्य विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्राला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी प्रास्ताविकात अत्याधुनिक शिक्षण व संशोधनाच्या माध्यमातून आदर्श उपकेंद्र उभारण्याचा विद्यापीठाचा मानस व्यक्त केला. नाशिक-पुणे शिक्षणाचा स्वतंत्र कॉरिडॉर निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

