मुंबई प्रतिनिधी
मंत्रालयासह राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महत्त्वाच्या तसेच ‘मलाईदार’ समजल्या जाणाऱ्या पदांवर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून संकलित करण्यात आली असून, सुमारे ३१४ अधिकाऱ्यांची यादी तयार झाल्याची माहिती आहे. या अधिकाऱ्यांना सध्याच्या विभागातून अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने मंत्रालयात मोठ्या प्रशासकीय फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.
मंत्रालयातील विविध विभागांबरोबरच मंत्रालयाबाहेरील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्येही काही अधिकारी अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत आहेत. काही अधिकारी जवळपास दशकभर एकाच विभागात महत्त्वाच्या पदावर असल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे दीर्घकाळ एकाच ठिकाणी राहिल्याने निर्माण होणारे हितसंबंध आणि प्रशासकीय प्रभाव याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
नियुक्त्यांचा घेतला जातोय आढावा
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा आढावा घेतला जात असल्याचे समजते. संबंधित अधिकारी किती वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत आहेत, कोणत्या पदावर आहेत आणि त्यांच्या बदलीला किती कालावधी झाला आहे, याची माहिती संकलित करण्यात आली आहे.
या प्रक्रियेत दीर्घकाळ एकाच विभागात कार्यरत असलेल्या सुमारे ३१४ अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यास मंत्रालयासह विविध शासकीय विभागांच्या प्रशासकीय रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चेला उधाण
दरम्यान, काही अधिकारी राजकीय वरदहस्तामुळे महत्त्वाच्या पदांवर दीर्घकाळ कायम असल्याची चर्चा प्रशासनात आहे. त्यामुळे प्रस्तावित फेरबदलात अशा अधिकाऱ्यांचाही समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पातळीवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना अन्य विभागात पाठवून प्रशासकीय यंत्रणेत नव्या अधिकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
मंत्री आस्थापनांनंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे लक्ष
याआधी मुख्यमंत्री कार्यालयाने मंत्री आस्थापनांवर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडींच्या नियुक्त्यांचाही आढावा घेतला होता. अनेक वर्षे मंत्री आस्थापनांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्यात आले होते.
त्यानंतर आता मंत्रालयातील प्रशासकीय यंत्रणेच्या अन्य स्तरांवरील अधिकाऱ्यांकडेही मुख्यमंत्री कार्यालयाचे लक्ष वळल्याचे दिसून येत आहे.
मंत्रालयाबाहेरील अधिकाऱ्यांचाही समावेश
प्रस्तावित फेरबदल केवळ मंत्रालयापुरता मर्यादित नसून विविध शासकीय विभाग आणि मंत्रालयाबाहेरील महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचाही आढावा घेतला जात असल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर ३१४ अधिकाऱ्यांच्या संभाव्य बदल्यांकडे प्रशासनाचे लक्ष लागले असून, अंतिम निर्णयानंतर मंत्रालय आणि विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल होण्याची शक्यता आहे.

