मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शाळेचा गणवेश घालून घरातून बाहेर पडलेल्या, पण शाळेत न जाता पोहण्याच्या मोहापायी पाण्याच्या टाकीत उतरलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी परिसरात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पटेल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
झैब पटेल (१५) आणि नकीब पटेल (१३) अशी मृत भावंडांची नावे आहेत. झैब इयत्ता दहावीत, तर नकीब नववीत शिक्षण घेत होता. जोगेश्वरी गुंफा इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या या दोघा भावांनी शुक्रवारी शाळेला दांडी मारली होती.
नेहमीप्रमाणे शाळेला निघालेल्या दोन्ही भावांनी शाळेत न जाता आरे कॉलनीतील गौतम नगर परिसरातील मॉडर्न बेकरी जंक्शनजवळील एका तबेल्याकडे मोर्चा वळवला. तेथे असलेल्या पाण्याच्या टाकीत दोघेही पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. काही वेळातच दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दल, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना पाचारण केले. आपत्कालीन यंत्रणांनी दोन्ही मुलांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर पटेल कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मुलांच्या अकाली मृत्यूने आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. शाळेला मारलेली एक दिवसाची दांडी या दोन निष्पाप भावंडांच्या आयुष्याची अखेर करेल, असा विचारही कुटुंबीयांनी केला नव्हता. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

