मुंबई प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी आणि विहित मुदतीत विनियोग करण्यास सर्व विभागांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यंदा केंद्रीय निधीच्या विनियोगाचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक राहील, याची खबरदारी विभागप्रमुखांनी घ्यावी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
केंद्रीय योजनांमधून उपलब्ध होणारा निधी आणि त्याच्या विनियोगाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते.
राज्याच्या विविध योजनांसाठी उपलब्ध निधीला केंद्रीय योजनांच्या निधीची जोड देऊन त्याचा अधिक परिणामकारक वापर करण्याचे नियोजन विभागांनी करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. केंद्रीय निधीचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यास राज्यातील विकासकामांना अधिक गती देता येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुढील वर्षात सुमारे १६ ते १७ हजार कोटी रुपयांचा केंद्रीय निधी खर्च करण्याची क्षमता असून, यातील मोठा हिस्सा भांडवली खर्चासाठी आहे. त्यामुळे हा निधी वेळेत खर्च करण्यास विभागप्रमुखांनी प्राधान्य द्यावे. योजनांची व्यापक अंमलबजावणी करून विहित मुदतीत निधीचा विनियोग करण्याची जबाबदारी विभागांनी स्वीकारावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचित केले.
केंद्रीय क्षेत्रातील योजनांचा किती निधी कोणत्या विभागाकडे उपलब्ध आहे, त्यापैकी किती खर्च झाला आणि किती निधी शिल्लक आहे, याचा विभागनिहाय आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. लेखा प्रक्रियेतील अडचणींमुळे निधीचा विनियोग रखडत असल्यास त्या तातडीने दूर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
गेल्या दोन-तीन वर्षांतील निधी खर्चाचा आढावा घेऊन सर्व विभागांनी आपल्या त्रुटी दूर कराव्यात. निधी खर्च झाला असूनही तो लेखांकनात दिसत नसल्यास त्याची कारणे स्पष्ट करावीत. तसेच खर्च न झालेला निधी वेळेत कसा वापरता येईल, याचे नियोजन करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, केंद्रीय निधीच्या विनियोगावर नियमित आणि प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. दर तीन महिन्यांनी निधीच्या वापराचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील निर्देशक निश्चित करावेत, अशी सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

