मुंबई प्रतिनिधी
मुंबई : कुर्ल्यातील कुरेशी नगर परिसरात मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. एका १७ मजली इमारतीच्या पाडकामाचे काम सुरू असताना पोकलेन मशीन वरच्या मजल्यावर नेण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या हायड्रॉलिक क्रेनचा काही भाग तुटून थेट रेल्वेच्या उच्चदाब ओव्हरहेड वायर, झोपड्या आणि रस्त्यावर कोसळला. या दुर्घटनेत तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह १० जण जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
#WATCH | Mumbai | A large crane collapsed on a house in Qureshi Nagar, Kurla, late last night, leaving more than 10 people injured pic.twitter.com/dEp7W8GlYX
— ANI (@ANI) August 21, 2026
ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे २.४० वाजण्याच्या सुमारास घडली. कुरेशी नगर परिसरात एम/एस सनी कंपनीकडून भुईमजला अधिक १७ मजली बांधकामाच्या ठिकाणी पाडकामाचे काम सुरू होते. या दरम्यान पोकलेन मशीन हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने वरच्या मजल्यावर नेण्यात येत होती. मात्र, उचलण्याचे काम सुरू असतानाच क्रेनचा काही भाग अचानक खाली कोसळला.
क्रेनचा भाग रेल्वेच्या उच्चदाब ओव्हरहेड वायरवर पडला. त्याशिवाय कुरेशी नगर परिसरातील काही झोपड्या, सम्राट अशोक नगर परिसरातील रस्ता तसेच म्हाडा इमारतीची संरक्षक भिंत यांचे नुकसान झाले. म्हाडा इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले.
या दुर्घटनेत एकूण १० जण जखमी झाले. त्यापैकी आठ जणांना सायन रुग्णालयात, तर दोघांना कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायन रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये जग्रुल्ला नबी मोहम्मद खान (६३), अहमद नियाझ अहमद , अतिकूर रेहमान (६०), हाकुम शेख (३६), नुमान खान (२१), रेहमान खान (१९), सूरज गौर (१०) आणि अकबर (४०) यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर, कुर्ला भाभा रुग्णालयात राजू गौड (३५) आणि आरती गौड (३०) या दोघांना दाखल करण्यात आले असून त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनाग्रस्त क्रेन हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचे नुकसान झाल्याने संबंधित विभागाकडूनही परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. हा मार्ग प्रामुख्याने मालगाड्यांसाठी वापरला जात असल्याने लोकल रेल्वे सेवेला कोणताही फटका बसला नसल्याचे समजते.
मध्यरात्री घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे कुरेशी नगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, क्रेन कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

