परभणी प्रतिनिधी
परभणी : मतदार यादीमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बीएलओला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. रामेश्वर काळे असे अटक करण्यात आलेल्या बीएलओचे नाव आहे. परभणी शहरातील स्टेशन रोड परिसरातील बालाजी भोजनालय येथे एसीबीने ही कारवाई केली.
एसआयआर प्रक्रियेत नावे वगळली गेल्यास पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती दाखवत संबंधित मतदारांकडून लाच मागितल्याचा आरोप रामेश्वर काळे याच्यावर आहे. मतदारांकडून लाच मागितली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रामेश्वर काळे याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
प्रारूप मतदार यादीवर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींवर नोटीस देणे तसेच त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेनंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

