मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील मोकळ्या जागा, राखीव भूखंड आणि मैदाने खासगी संस्था तसेच सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांना देण्याचा डाव सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केला. मुंबईकरांच्या हक्काच्या जागांचे कथित खासगीकरण आणि भूखंडांचे व्यवहार रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात येत्या रविवारी, २३ ऑगस्ट रोजी तिरंगा मोर्चा काढण्यात येणार असून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील विविध भूखंड आणि मोकळ्या जागांबाबत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप केले. मुंबईतील राखीव मोकळ्या जागा आणि भूखंड हडपण्याचा सत्ताधाऱ्यांचा सुप्त हेतू असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वीही केला होता. या जागा व्यावसायिक वापरासाठी अथवा ठराविक संस्थांच्या ताब्यात देण्याऐवजी त्या सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
‘५५० कोटींच्या भूखंडाचा वार्षिक भाडेपट्टा २१ लाखांत?’
पत्रकार परिषदेत एका भूखंडाचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले. संबंधित भूखंडाची सुमारे दहा वर्षांपूर्वीची किंमत ५५० कोटी रुपये होती. आज त्या भूखंडाची किंमत किती असेल, याचा अंदाज मुंबईकरांनीच घ्यावा, असे ते म्हणाले. मात्र, एवढ्या मोठ्या मूल्याच्या भूखंडाचा वर्षाला २१ लाख रुपये या दराने वापर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
‘मुख्यमंत्री हा भूखंड भाजपच्या एका आमदाराला भेट म्हणून देत आहेत,’ असा आरोपही ठाकरे यांनी केला. मुंबईतील जुहूमधील दोन आणि आणखी एक महत्त्वाचा भूखंड मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या खासगी ट्रस्टला म्हणजेच भाजपच्या आमदाराला देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे मुंबईतील भूखंडांच्या व्यवहाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेव्हल डिसोजा फुटबॉल टर्फवरूनही सवाल
मुंबईतील नेव्हल डिसोजा फुटबॉल टर्फच्या मुद्द्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी महापालिका आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुंबईतील फुटबॉलसाठी महत्त्वाचे असलेले हे एकमेव मोठे कृत्रिम आणि अधिकृत असोसिएशनचे टर्फ असल्याचा दावा त्यांनी केला.
हे मैदान मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ताब्यात घेऊन एका ट्रस्टला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा प्रयत्न असून, नेव्हल डिसोजा यांचे नाव हटवून भाजपच्या एका नेत्याचे नाव देण्याचा घाट घातला जात असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले.
‘मुंबईतील मैदाने भाजपच्या मित्रांना देण्याचा प्रयत्न’
मुंबईतील विविध मैदानांवर आणि मोकळ्या जागांवर डोळा ठेवण्यात आल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले की, सिद्धिविनायक मंदिरामागील मैदानात मेट्रो-३च्या माध्यमातून घुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईतील अनेक मैदाने भाजपच्या मित्रांना देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
याशिवाय बेस्टच्या २२ डेपोंच्या खासगीकरणाच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध केला. हा प्रस्ताव घाईघाईने मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत मुंबईतील सार्वजनिक मालमत्ता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खासगीकरणाच्या दिशेने नेली जात असल्याचे त्यांनी म्हटले.
मुलुंडमधील आरक्षित भूखंडाचा मुद्दा
मुलुंडमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असलेली जागा पेट्रोल पंपासाठी देण्यात येत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईतील मोकळ्या जागा आणि मैदाने हळूहळू व्यावसायिक वापरासाठी खुली केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
‘मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागांचे खासगीकरण करायचे आहे. मुंबई महानगरपालिका भाजपला यासाठीच हवी होती,’ असा आरोप त्यांनी केला. मुंबईतील मोकळ्या जागांचे संरक्षण हा केवळ राजकीय पक्षाचा विषय नसून प्रत्येक मुंबईकराचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘पक्ष, जात-धर्म बाजूला ठेवा; तिरंगा हातात घ्या’
या कथित भूखंड गैरव्यवहाराविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देताना आदित्य ठाकरे यांनी २३ ऑगस्ट रोजी तिरंगा मोर्चाची घोषणा केली. रविवारी सायंकाळी ५ वाजता रंगशारदासमोरील नेव्हल डिसोजा फुटबॉल टर्फ येथे मुंबईकरांनी तिरंगा घेऊन जमावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘पक्ष, जात, पात, धर्म हे सर्व बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येण्याची गरज आहे,’ असे ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील भूखंडांचा कथित गैरव्यवहार आणि मोकळ्या जागांचे खासगीकरण थांबेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आरोपांमुळे राजकीय वातावरण तापणार
मुंबई महापालिका आणि शहरातील मोकळ्या जागांवरून गेल्या काही काळापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर थेट निशाणा साधत २३ ऑगस्टला तिरंगा मोर्चाची घोषणा केल्याने मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर राज्य सरकार आणि संबंधित संस्थांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

