मुंबई प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ पूर्ण होणार नसल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या दाव्याला दुजोरा देत खळबळजनक वक्तव्य केले आहे. “नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आपली टर्म पूर्ण करणार नाहीत. त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावे लागेल. १७ सप्टेंबरनंतर मोठा उलगडा होईल,” असा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच मोदी पायउतार झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीत त्यांनी केले.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांना राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण गेल्या काही दिवसांपासून नव्हे, तर गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ पूर्ण होणार नसल्याचे सांगत असल्याचे नमूद केले.
“मी गेले काही दिवस काय सांगतो? मी गेले काही महिने हेच सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची टर्म पूर्ण करत नाहीत. त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावे लागेल. तुम्हाला १७ सप्टेंबरनंतर याचा उलगडा होईल,” असे राऊत म्हणाले.
१७ सप्टेंबरनंतर नेमकं काय होणार?
राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे याच तारखेचा संदर्भ देत राऊत यांनी मोदींच्या राजकीय भवितव्याबाबत दावा केला आहे.
“१७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस आहे. त्यामुळे अंधभक्तांनी उड्या माराव्यात, पार्ट्या कराव्यात,” अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.
याचवेळी त्यांनी अमित शाह यांच्या पंतप्रधानपदाच्या शक्यतेवरही भाष्य केले. “अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत. मोदी पायउतार झाल्यावर काय? एकावर एक फ्री आहे,” असे म्हणत राऊत यांनी भाजपच्या नेतृत्वाबाबतही सूचक विधान केले.
‘लाल किल्ल्यावरील भाषणही शेवटचे’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचाही राऊत यांनी संदर्भ दिला. “लाल किल्ल्यावर मोदींचं शेवटचं भाषण होतं. पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल,” असा दावा त्यांनी केला.
आपण ही विधाने केवळ राजकीय अंदाजावर आधारित करत नसून, जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलत असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.
“माझ्याकडे जी काही माहिती आहे किंवा राहुल गांधी जे सांगतात, आमच्यासमोर जे काही तथ्य येतात, त्यानुसार मी सांगत आहे. हे मी जागतिक स्तरावर जे चित्र आहे, त्यानुषंगाने बोलत आहे,” असे राऊत यांनी सांगितले.
राऊत यांच्या या दाव्याला कोणते ठोस पुरावे किंवा माहितीचा आधार आहे, याबाबत मात्र त्यांनी सविस्तर खुलासा केलेला नाही. त्यामुळे १७ सप्टेंबरनंतर नेमका कोणता ‘उलगडा’ होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अयोध्या राम मंदिर प्रकरणावरूनही राऊत आक्रमक
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणात चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीनचिट मिळाल्याच्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
“चोरांनी चोराला चोरायला सोडायचं, हे चाललं आहे. चंपत राय आणि अनिल मिश्रा सर्वत्रच आहेत. महाराष्ट्रातही आहेत,” अशी टीका राऊत यांनी केली.
संबंधित व्यक्तींना क्लीनचिट मिळाली असली तरी या प्रकरणातील आंदोलन थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “त्यांना सोडलं असलं तरी आमचं आंदोलन संपणार नाही. मोरगाव येथे आमचं आंदोलन आहे. मी स्वतः आंदोलनात भाग घेण्यासाठी जात आहे,” असे राऊत यांनी सांगितले.
राऊतांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण
एकीकडे राहुल गांधी यांच्या मोदींच्या कार्यकाळाबाबतच्या कथित वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी त्याला समर्थन देत १७ सप्टेंबरनंतर मोठा उलगडा होणार असल्याचा दावा केला आहे. त्यातच मोदींचा कार्यकाळ, अमित शाह यांच्या पंतप्रधानपदाची शक्यता आणि लाल किल्ल्यावरील भाषण याबाबत राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आगामी काळातील राजकीय घडामोडींबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मात्र, १७ सप्टेंबरनंतर नेमकी कोणती राजकीय घडामोड घडणार, राऊत यांच्याकडे कोणती माहिती आहे आणि त्यांच्या दाव्याला कोणता आधार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे राऊत यांच्या या दाव्याचा राजकीय पडसाद काय उमटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

