पिंपरी प्रतिनिधी
राज्यातील अन्न व औषध भेसळीविरोधात कठोर भूमिका घेत कारवाईचा धडाका सुरू ठेवणारे अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. भेसळ माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने मुंढे यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तुकाराम मुंढे यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही निवेदन देण्यात आले आहे. राज्यातील अन्न व औषध उद्योगातील गैरप्रकार तसेच भेसळीविरोधात एफडीएने आक्रमकपणे कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या घटकांवर मोठा दबाव निर्माण झाला असून, त्यातून या माफियांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनात केला आहे.
भेसळ माफियांवर कारवाईचा धडाका
अन्नपदार्थ आणि औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या घटकांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलल्यामुळे भेसळीला आळा घालण्यास मदत होत आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर कोणतीही तडजोड न करता कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, या कारवाईमुळे आर्थिक हितसंबंधांना धक्का बसलेल्या माफियांकडून अधिकाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक प्रशासकीय कार्यपद्धतीसाठी परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सुरू असलेल्या कारवाईला विरोध करणाऱ्या घटकांकडून संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
‘वेळ निघून जाण्यापूर्वी निर्णय घ्या’
“राज्यातील एका प्रामाणिक आणि कर्तृत्ववान आयएएस अधिकाऱ्याच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये. संभाव्य धोका निर्माण झाल्यानंतर सुरक्षा वाढविण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे,” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान करून त्यांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भेसळविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी त्यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, डॉमिनिक लोबो, राजू साबळे आणि प्रकाश जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आता राज्य सरकार या मागणीची दखल घेऊन तुकाराम मुंढे यांच्या सुरक्षेचा आढावा घेते का आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

