
अहिल्यानगर प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिर्डी याठिकाणी आज पहाटे तीन जणांवर जीवघेणा फळ हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांवर हा हल्ला करण्यात आला आहे.
तिघंही पहाटेच्या सुमारास कामावर जात होते, यावेळी दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच रात्री तीन जणांवर अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ज्या तीन जणांवर हल्ले झाले, त्यातील दोघेजण शिर्डी येथील साई संस्थानाचे कर्मचारी आहेत. तर तिसरा जखमी तरुण देखील पहाटे एका खासगी कंपनीत ड्युटीवर जाताना त्याला टार्गेट करण्यात आलंय. सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही साई संस्थानचे कर्मचारी आहेत. सुभाष घोडे यांच्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला करण्यात आला. तर नितीन शेजुळ यांच्यावर साकुरी शिव परिसरात हल्ला झाला आहे. या दोघांवर झालेला हल्ला इतका भयंकर होता की, दोघांचाही मृत्यू झाला आहे.
हल्ला झालेल्या तिसऱ्या तरुणाचं नाव कृष्णआ देहरकर असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाल्या, तिघांना अशाप्रकारे का टार्गेट करण्यात आलं? याबाबत काहीच माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्र फिरवली आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपींना अटक केलं जाईल, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय.
ड्रग्ज किंवा इतर अमली पदार्थ्यांच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून पैशांसाठी हल्ले केले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र हल्ल्याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही. ज्यावेळी हे हल्ले झाले, त्यावेळी स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी ही प्रकरणं गांभीर्याने घेतली नाहीत. संबंधितांचा अपघाती मृत्यू झाल्याचा अंदाज लावून या प्रकरणाकडे पोलिसांनी कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे पदाधिकारी सचिन चौगुले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलिसांनी हे प्रकरण निष्काळजीपणाने हाताळल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे.