
गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पंचायत समितीचे माजी सभापतींची माओवाद्यांनी निर्घृण हत्या केली आहे. माओवाद्यांनी घरातून उचलून नेत त्यांची हत्या केली आहे.
हत्या केल्यानंतर माओवाद्यांनी मृतदेहाजवळ एक पत्रक देखील ठेवलं आहे. हत्या का केली? याचं कारण पत्रकातून दिलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सुखराम महागू मडावी असं हत्या झालेल्या पंचायत समितीच्या माजी सभापतींचं नाव आहे. ते गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील कियेर गावातील रहिवासी होते. माओवाद्यांनी शनिवारी रात्री उशिरा त्यांना राहत्या घरातून उचलून गेलं. गावाबाहेर निर्जनस्थळी घेऊन जात त्यांची निर्घृण हत्या केली. माओवाद्यांनी मडावी यांच्या मृतदेहाजवळ पत्रक टाकलं असून त्यात मडावी यांचा उल्लेख पोलिसांचा खबऱ्या असा करण्यात आला आहे. मडावी हे नव्याने निर्माण होत असलेल्या पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी जबाबदार आहेत, असंही पत्रकात म्हटलं आहे.
पंचायत समितीच्या माजी सभापतींची अशाप्रकारे हत्या झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून गडचिरोली आणि भामरागड परिसरात माओवादी कारवाया कमी झाल्या होत्या. पण मडावी यांची हत्या करून माओवाद्यांनी पुन्हा एकदा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्रकात नेमकं काय म्हटलं आहे?
लोकद्रोही सुखराम मडावी याने भामरागड, डोडाराज आणि गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाशी हातमिळवणी केली होती. तो लाखो रुपयांच्या मोहात अडकून पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करत होता. नेलगुंडा, कउंडे, पेनगुंडा, आलदंडी, पोयोरकोटी, मीडंगुरवेचा अशा अनेक गावातील आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पकडून देण्यात आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यामध्ये मडावीचा हात होता. तसेच त्याने पेसा कायद्याच्या विरोधात जाऊन पेनगुंडा गावात नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याचं काम केलं. तसेच वेगवेगळ्या खाणी कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचं काम मडावीने केलं. त्यामुळे पीएलजीएने मडावीला मृत्यूची शिक्षा दिली, असं माओवाद्यांनी पत्रात म्हटलं आहे.