मुंबई प्रतिनिधी
‘७५ वर्षांवरील नेत्यांनी सत्ता सोडून तरुणांच्या हाती नेतृत्व द्यावे,’ अशी भूमिका मांडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी खोटे बोलू नये, असा टोला लगावत राऊत यांनी मोदींच्या स्वातंत्र्यलढ्यावरील वक्तव्यांवरही आक्षेप घेतला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो-लाखो तरुणांनी बलिदान दिले. अशा शूरवीरांचे स्मरण करण्याऐवजी स्वातंत्र्यदिनी राजकीय विधाने करणे दुर्दैवी आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
काँग्रेस, समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नसता, तर आज पंतप्रधानांना लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधीच मिळाली नसती, असा दावा राऊत यांनी केला. ‘भारत छोडो’ अर्थात ‘चले जाव’ आंदोलनाला विरोध केल्याचा इतिहास असल्याचे सांगत मोदींनी काँग्रेसवर केलेली टीका ही स्वातंत्र्यलढ्याशी बेईमानी करणारी असल्याचे ते म्हणाले.
“काँग्रेसशी आमचे कितीही मतभेद असले तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्या पक्षाचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. स्वातंत्र्यलढ्याच्या प्रखर सूर्यावर पंतप्रधानांनी थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी स्वातंत्र्याचा सूर्य हेच सांगत राहील की काँग्रेस, समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला,” असे राऊत यांनी सुनावले.
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवरही सवाल
दरम्यान, २०२३ मध्ये संसदेत एकमताने मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीवरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. “२०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक अद्याप लागू का करण्यात आले नाही? पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून याबाबत घोषणा केली असती, तर आम्ही त्याचे स्वागत केले असते,” असे राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर राऊत यांच्या या टीकेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

