मुंबई प्रतिनिधी
कर्तव्य बजावताना दाखविलेले असामान्य धैर्य, प्रतिकूल परिस्थितीत बजावलेली जबाबदारी आणि प्रदीर्घ काळ केलेली उल्लेखनीय सेवा यांची दखल घेत यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्रातील पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर गौरव करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या पदक यादीत महाराष्ट्र पोलीस तसेच अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि कारागृह विभागातील एकूण ८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि दीर्घकालीन उत्कृष्ट सेवेचा सन्मान करणाऱ्या या पदकांमुळे राज्यातील या योद्ध्यांच्या कामगिरीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
या यादीत महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते प्रत्यक्ष धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक शिरीष रवींद्र जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय बाजीराव जाधव आणि विजयकुमार गोपीनाथ मगर यांच्यासह विविध पदांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदके जाहीर झाली आहेत.
नक्षलग्रस्त भागात जीव धोक्यात घालून लढणाऱ्या २० पोलिसांना शौर्य पदक
महाराष्ट्र पोलीस दलातील २० अधिकारी व कर्मचाऱ्यांची शौर्य पदकासाठी निवड करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त भागातील मोहिमा तसेच गुन्हेगारांविरोधातील धाडसी कारवायांमध्ये जीवाची पर्वा न करता बजावलेल्या कामगिरीची दखल या निवडीद्वारे घेण्यात आली आहे. नक्षलविरोधी मोहिमांमध्ये प्रत्येक क्षणी जीविताचा धोका असताना या जवानांनी दाखविलेल्या धैर्याचा विशेष गौरव झाला आहे.
शौर्य पदकासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू पांडुरंग गवळी आणि पोलीस उपनिरीक्षक वासुदेव राजम मडावी यांची निवड झाली आहे. मडावी यांना यापूर्वीही शौर्य पदक मिळाले असून, यंदा त्यांना दुसऱ्यांदा हा सन्मान मिळणार आहे.
याशिवाय पोलीस हवालदार (नायक) दिलीप विठ्ठल अत्राम, तसेच पोलीस शिपाई अजय गोपाळराव मडावी, गणेश चंद्रम दुब्बुला, विजय झुरू मडावी, भूपेश मारोतराव जुमनाके, दळसू कटिया बोगमी, राजेश शामराव किरंगे, मासा बोरा अत्राम, विजय किस्तय्या कोडपे, दशरथ रामशहा मडावी, राकेश राजम बेडकी, सुधाकर जगन पोर्टेट, श्रीनिवास समय्या निष्टुरी, गणेश हनुमंतू गंजीव्हार, नितेश प्रभुदास टेंभेकर, शिवाजी मेस्सो हिचामी आणि संजय मल्लेश लंकाबंधवार यांचाही शौर्य पदकाने गौरव होणार आहे.
या यादीतील विशेष उल्लेखनीय नाव म्हणजे आयपीएस अधिकारी यतीश विजयराव देशमुख. ज्या धाडसी मोहिमेसाठी त्यांची शौर्य पदकासाठी निवड झाली, त्या वेळी ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. नक्षलवाद आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील मोहिमांमध्ये बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल त्यांच्या सन्मानातून घेण्यात आली आहे.
शिरीष जैन यांच्यासह तिघांना राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक
महाराष्ट्र पोलीस दलातील तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक शिरीष रवींद्र जैन, पोलीस उपअधीक्षक सुभाष नानासाहेब भुजंग आणि सहाय्यक उपनिरीक्षक संजय राजाराम वैचाळे यांचा त्यात समावेश आहे.
प्रदीर्घ काळ पोलीस दलात जबाबदारी, सचोटी आणि उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविल्याबद्दल शिरीष जैन यांचा विशेष सन्मान करण्यात येत आहे.
३७ पोलिसांना गुणवंत सेवा पदक
महाराष्ट्र पोलीस दलातील ३७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गुणवंत सेवेसाठी पदकासाठी निवड झाली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय बाजीराव जाधव आणि विजयकुमार गोपीनाथ मगर, पोलीस अधीक्षक दिगंबर पांडुरंग प्रधान, पोलीस उपअधीक्षक प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी, भागरीथ शिवाजी देशमुख, प्रवीण विनायक तेजले आणि मनोजकुमार माधवराव यादव यांचा त्यात समावेश आहे.
निरीक्षक वैभवकुमार जगदेवराव जाधव, संतोष धनसिंग बर्गे, विश्वजित वसंत इंगळे (कैंगडे), जितेंद्र आनंद कदम आणि विनोद प्रभाकर पाटील यांनाही गुणवंत सेवा पदक मिळणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक जनार्दन यशवंत देसाई, दिलीप भिमा धुमणे, दीपक अनंत ठाकूर, प्रकाश बळीराम कदम, चंद्रशेखर भास्करराव बाविस्कर आणि दिनेश विश्वनाथ बडगुजर यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
सहाय्यक उपनिरीक्षक अंकुश बाबालाल न्यायनिर्गुणे, विलास हनुमंतराव इंगळे, मुझफ्फर अली जफर अली सय्यद, मोहन अण्णासाहेब सौंदत्ती, संपत मुरलीधर खैरे, गुलाब प्रभाकर सोनार, शेखर दशरथ फर्ताळे, शेरखान दिलावरखान पठाण, सुनील निवृत्ती कदम, शैलेश चंद्रकांत उपासने, अरुण पत्रुजी अत्राम, शिवानंद महादेव स्वामी, पांडुरंग बाप्पाजी पाटील, अन्वरअली सय्यदअली सय्यद, गणेश शंकर शिंदे आणि मनोज गोपाळराव मंगरुळकर यांनाही गुणवंत सेवा पदकाने गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय निरीक्षक प्रदीप वसंतराव चौगवकर, हेड कॉन्स्टेबल भरत खिमजी गोहिल आणि राजकुमार यदोगिरी जानबंधू यांचाही या यादीत समावेश आहे.
आगीशी दोन हात करणाऱ्या अग्निशमन दलातील १५ जणांचा सन्मान
पोलीस दलाबरोबरच आगीच्या आणि आपत्तीच्या घटनांमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या महाराष्ट्र व मुंबई अग्निशमन दलातील १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही पदके जाहीर झाली आहेत. त्यापैकी १३ जणांना शौर्य पदक, तर दोघांना गुणवंत सेवा पदक मिळणार आहे.
शौर्य पदकासाठी विभागीय अग्निशमन अधिकारी मनोज विश्वनाथ सावंत, मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र नारायणराव आंबुलगेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, वरिष्ठ स्थानक अधिकारी ईश्वर खंडू कांबळे, स्थानक अधिकारी योगेश हिरालाल पवार आणि दत्तात्रय अशोक भोसले यांची निवड झाली आहे.
तसेच चालक-ऑपरेटर महेश आनंद गुडुलकर, अग्निशमन दलाचे कर्मचारी चिंतामणी शिवाजी खांडेकर, विकी नागेश सर्वदे, सुदर्शन घनश्याम पावडे आणि रमेश जीवन कोळी, चालक-वाहक राजेश विष्णू राणे आणि अग्निशमन कर्मचारी हर्षल शंकर कटके यांनाही शौर्य पदकाने गौरविण्यात येणार आहे.
दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर उत्तम मिसाळ आणि अग्निशमन कर्मचारी शैलेश महादेव जगताप यांना गुणवंत सेवा पदक देण्यात येणार आहे.
होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाचाही गौरव
कायदा व सुव्यवस्था राखताना तसेच विविध आपत्तींच्या वेळी पोलिसांना आणि प्रशासनाला मदत करणाऱ्या होमगार्ड व नागरी संरक्षण दलातील तीन जणांनाही गुणवंत सेवा पदक जाहीर झाले आहे. वरिष्ठ कर्मचारी अधिकारी पोपट रामजी सांगडे, होमगार्ड अशोक नामदेव इंगळे आणि मनोज सदाशिव बरसागडे यांचा त्यात समावेश आहे.
कारागृह विभागातील चौघांचा सन्मान
कारागृह व्यवस्थेत प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही स्वातंत्र्यदिनाच्या पदक यादीत गौरव करण्यात आला आहे. सुभेदार संजीव सखाराम घाणेकर आणि हवालदार संजय राजारामजी तलवार यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळणार आहे. तर कारागृह अधीक्षक विकास हनुमंतू राजनलवार आणि हवालदार महेश लक्ष्मण गडनाईक यांची गुणवंत सेवा पदकासाठी निवड झाली आहे.
शौर्य, सेवा आणि कर्तव्यनिष्ठेला सलाम
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली ही पदके केवळ पुरस्कार नसून, देशाची आणि राज्याची सुरक्षा, नागरिकांचे प्राण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेची राष्ट्रीय पातळीवरील पावती आहे. नक्षलग्रस्त भागातील जीवघेण्या मोहिमा असोत, गुन्हेगारांविरोधातील कारवाया असोत किंवा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या नागरिकांचे प्राण वाचविण्याचे आव्हान असो, धोक्याची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी होणारा गौरव निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

