मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील पदपथ पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत वाकोला परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. राजेंद्र कांबळे मार्गालगतच्या पदपथावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली तब्बल ३७ दुकाने मंगळवारी (११ ऑगस्ट) महापालिकेच्या पथकाने निष्कासित केली. या कारवाईमुळे दीर्घकाळ अतिक्रमणामुळे अरुंद झालेला पदपथ पुन्हा पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पूर्व’ विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. पदपथावर अनधिकृत दुकाने उभारून पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.
उपायुक्त (परिमंडळ-३) विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एच पूर्व विभाग) मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान राजेंद्र कांबळे मार्गालगतच्या पदपथावरील ३७ अनधिकृत दुकानांचे निष्कासन करण्यात आले. तसेच, पदपथावर अडथळा निर्माण करणारे विविध साहित्यही महापालिका पथकाने जप्त केले.
पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात कारवाई तीव्र
मुंबईतील अनेक भागांत पदपथांवर अनधिकृत फेरीवाले, दुकाने आणि विविध प्रकारचे अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः गर्दीच्या भागात पदपथ उपलब्ध नसल्याने नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोकाही वाढतो.
या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मुंबई महानगरपालिकेने पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कारवाईला वेग दिला आहे. महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियान राबविण्यात येत असून, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणे हटवून ते नागरिकांसाठी सुलभ करण्यावर भर देण्यात येत आहे.
वाकोला येथील कारवाई ही याच मोहिमेचा भाग असून, भविष्यातही पदपथांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संबंधित विभागांकडून देखरेख ठेवली जाणार आहे. पदपथ मोकळे झाल्याने परिसरातील नागरिकांना सुरक्षितपणे आणि अडथळ्याविना ये-जा करता येणार आहे.

