मुंबई प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपरच्या चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीवर बुधवारी पहाटे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. डोंगरावरील दरडीचा ढिगारा थेट चाळीतील घरांवर कोसळल्याने आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यात लहान मुलांचाही समावेश असण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
पालिकेच्या मुंबई अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, बुधवारी (१२ ऑगस्ट) पहाटे ३.४८च्या सुमारास चिराग नगर परिसरातील राठोड मेडिकलजवळ दरड कोसळली. दरडीचा मोठा ढिगारा गौशिया चाळीवर पडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस, पालिका कर्मचारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
पत्रे तुटून दरड घरात कोसळली
दरड कोसळण्याच्या घटनेनंतर स्थानिकांनी थरकाप उडवणारा अनुभव सांगितला. एका रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री सर्वजण झोपले असताना अचानक डोंगरावरून झाडे आणि दगड घरांवर कोसळले. त्यानंतर घरांची पत्रे तुटून दरड थेट घरातील नागरिकांवर पडली. या घटनेनंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. रात्री पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.
दरडीखाली काही लहान मुलेही अडकली असण्याची शक्यता महिलांनी व्यक्त केली. आपल्या कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याने अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. बचाव पथकांकडून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.
चार-पाच जण अडकल्याची शक्यता
डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे अशोक नगर परिसरात दरड कोसळली. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके काम करत आहेत.
संरक्षक भिंतींसाठी निधी वाढवण्याची मागणी
या दुर्घटनेनंतर आमदार राम कदम यांनी डोंगराळ भागातील संरक्षक भिंतींच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मुलुंडपासून चांदिवलीपर्यंतच्या डोंगराळ भागात संरक्षक भिंतींची आवश्यकता असून, त्यासाठी उपलब्ध निधीला मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. धोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे शासनस्तरावर स्थलांतर करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संरक्षक भिंती बांधल्यानंतर त्याच्या परिसरात पुन्हा अनधिकृत झोपड्या उभ्या राहत असल्याचा आरोप कदम यांनी केला. महानगरपालिका, जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने अनधिकृत बांधकामांना आळा बसत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संरक्षक भिंतींसाठी निधी वाढविण्याची गरज असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

