मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बांद्रा परिसरातून अचानक बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या बहीण-भावाचा ४८ तासांच्या अथक शोधानंतर खेरवाडी पोलिसांनी सुखरूप शोध घेतला. नुमान अमजद खान (वय ९ वर्षे) आणि इकरा अमजद खान (७ वर्षे) ही भावंडे ३ ऑगस्टच्या रात्री राजीव नगर आणि ज्ञानेश्वर नगर परिसरातून बेपत्ता झाली होती. दोन्ही मुले घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने अखेर खेरवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास नुमान आणि इकरा अचानक बेपत्ता झाले. बराच वेळ उलटूनही दोन्ही मुले घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. अज्ञात व्यक्तीने फूस लावून दोन्ही मुलांना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तक्रार मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला.
पोलिसांनी बांद्रा परिसरातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत मुलांचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने परिसरातील विविध भागांत सलग तपास केला. दोन अल्पवयीन मुले बेपत्ता असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही कसर न सोडता शोधमोहीम सुरू ठेवली.
दरम्यान, तब्बल ४८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास बांद्रा पश्चिम बस स्थानक परिसरातील एका कॅन्टीनच्या दुसऱ्या मजल्यावर नुमान आणि इकरा सुखरूप आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेत त्यांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर दोन्ही मुलांना त्यांच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. मुलं सुखरूप मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या शोधमोहीमेत पोलीस उपनिरीक्षक मंगेश राडये, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस हवालदार ठोंबरे, ठाकरे, सावंत आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. सलग ४८ तास तपास आणि शोधमोहीम राबवत पोलिसांनी अखेर दोन्ही चिमुकल्यांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांकडे परत आणले.

