मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व आठ खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सोमवारी (१० ऑगस्ट) भेट होणार आहे. महाराष्ट्रातील विविध विकासात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट निश्चित झाल्याची माहिती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रस्तावित ‘एफसीआरए’ विधेयकाला (Foreign Contribution Regulation Act) आपल्या पक्षाचा विरोध असल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले. ‘या विधेयकाबाबत सरकारने घाई करू नये. चर्चा करून योग्य मार्ग काढावा,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढते शहरीकरण आणि खासदारांच्या विकासनिधीच्या अंमलबजावणीतील अडचणी यांसह राज्यातील विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडण्यात येणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.
‘संसदेचे कामकाज सातत्याने बाधित होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न थेट पंतप्रधानांसमोर मांडण्याचा निर्णय आमच्या खासदारांनी घेतला. सर्व आठ खासदारांनी पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात भेटीची वेळ मिळाली आहे,’ असे सुळे यांनी सांगितले.
खासदारांना मिळणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या विकासनिधीच्या अंमलबजावणीतील अडचणींचाही मुद्दा या भेटीत मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न घेऊन पंतप्रधानांची भेट घेत असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
‘आम्हाला नाश्त्याला बोलावले नाही’
अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली.
‘एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना नाश्त्यासाठी बोलावण्यात आले होते; आम्हाला नाश्त्यासाठी बोलावले नाही,’ असा चिमटा त्यांनी काढला. मात्र, आमची भेट महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी असून त्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘एफसीआरए’ विधेयकावर आक्षेप
दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘एफसीआरए’ विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध राहणार असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. ‘भारत सरकारला आमची विनंती आहे की, एफसीआरए विधेयकाबाबत घाई करू नका. या विषयावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. लोकशाही पद्धतीने चर्चा करून योग्य मार्ग काढला पाहिजे. हे विधेयक आमच्यावर लादू नका,’ असे त्या म्हणाल्या.
परदेशातून येणाऱ्या निधीच्या गैरवापराबाबतही सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘चुकीच्या पद्धतीने पैसे आले असतील, ड्रग्जचा पैसा असेल किंवा अन्य गैरप्रकारातून पैसा आला असेल तर त्याला नक्कीच विरोध केला पाहिजे. मात्र, मदतीच्या उद्देशाने काही जवळचे लोक किंवा संस्था आर्थिक सहकार्य करत असतील, तर प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने पाहणे योग्य नाही,’ असे सुळे यांनी सांगितले.
या विषयावर सरकारसोबत संयुक्त चर्चा करण्याची पक्षाची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘एफसीआरए’ विधेयकाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

