मुंबई प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपताल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. २ ऑगस्ट रोजी पहाटे २.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक वारशाशी जोडलेला एक महत्त्वाचा दुवा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
शकुंतला सपताल या काही काळापासून नालासोपारा येथे मुलगा प्रशांत यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर सातत्याने वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर त्यांनी निधन पावले. ३ ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात संजय, राजेश, प्रशांत हे तीन मुलगे, नंदिनी ही कन्या तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा विवाह इस्लामपूर येथील शिक्षित तरुण अजित सपताल यांच्यासोबत स्वतः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लावून दिला होता.
लहानपणापासून सामाजिक चळवळींशी नाते
शकुंतलाबाई यांचे बालपण सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी वातावरणात गेले. कम्युनिस्ट पक्षाच्या बाल संघात तसेच सांस्कृतिक कला पथकात त्या सक्रियपणे सहभागी होत असत. त्यांची आई कॉ. जयवंताबाई साठे यांच्यासोबत त्या पक्षाच्या मुखपत्रांच्या विक्रीसाठीही काम करत. समाजजागृतीची आणि परिवर्तनाची शिकवण त्यांना घरातूनच मिळाली होती.
अण्णा भाऊंच्या साहित्यनिर्मितीत मोलाचा सहभाग
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यनिर्मितीत शकुंतलाबाईंचा महत्त्वाचा वाटा होता. अण्णा भाऊंच्या अनेक कथा, कादंबऱ्या आणि साहित्यकृतींच्या त्या पहिल्या वाचक होत्या. अण्णा भाऊंचे हस्ताक्षर समजणे अनेकदा कठीण जात असल्याने हस्तलिखितांतील चुका दुरुस्त करणे, आवश्यक सूचना करणे आणि लेखन अधिक सुसंगत करण्यासाठी त्या मदत करत असत. त्यामुळे त्यांच्या साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेतील त्या एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानल्या जात होत्या.
आठवणी शब्दबद्ध करणारी कन्या
साहित्याची विशेष आवड असलेल्या शकुंतलाबाईंनी अण्णा भाऊ साठे यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी, संघर्ष आणि व्यक्तिमत्त्वावर आधारित अनेक लेख लिहिले. लोकशाहीरांच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलू त्यांनी आपल्या लेखनातून जतन केले. त्यांच्या आठवणींमुळे अण्णा भाऊंच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
शोकभावना व्यक्त
शकुंतला सपताल यांच्या निधनानंतर साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात आल्या.


