मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे उद्धव ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे आणि कल्याण येथील पक्षपदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान दोन गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा प्रकार पाहून उद्धव ठाकरे संतप्त झाले आणि पक्षातील अंतर्गत वादावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारताना, “देशातील एक तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत आहे आणि तुम्ही आपसातच भांडत आहात. तुमच्या वागण्याला काही अर्थ आहे का?” असा सवाल उपस्थित केला. तसेच त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा उल्लेख करत पक्षासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश दिल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. पक्षातील या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे संघटनबांधणीवर भर देत राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख आणि विधानसभा मतदारसंघ प्रमुखांची बैठक घेतली होती. त्यानंतर सोमवारी ठाणे आणि कल्याणमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. मात्र, या बैठकीतच दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ वातावरण तापले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षशिस्तीवर भर देत संबंधित पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे.


