नवी दिल्ली वृत्तसंध्या
नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या २२व्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी सरकारसमोर तीन अटी ठेवल्या असून त्या संदर्भात सर्व पक्षांच्या खासदारांना पत्र लिहिले आहे. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी लिहिलेल्या पत्रात वांगचुक यांनी, “मला सफदरजंग रुग्णालयात अवैधरित्या ताब्यात ठेवण्यात आले असून माझ्या हालचाली, बोलणे आणि भाषणावर निर्बंध घालण्यात आले आहेत,” असा आरोप केला आहे. माझ्या मागण्यांबाबत संसदेत चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी तीन अटी मांडल्या आहेत. सरकारने अलीकडील पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारावी, मी किंवा सीजेपीचे प्रतिनिधी संसद परिसरात पोहोचल्यास विविध पक्षांच्या खासदारांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे लेखी आश्वासन द्यावे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही तर खासदारांनी रुग्णालयात येऊन चर्चा करून आश्वासन द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. या अटी मान्य झाल्यास २० जुलै रोजी उपोषण थांबवण्याची तयारी असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, जंतरमंतरवरून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी त्यांच्या संमतीशिवाय उपचार करू नयेत, अशी भूमिका घेतली होती. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील घडामोडींवर संसदेत चर्चा झाल्यास उपोषण मागे घेतले जाईल, असेही त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.
दरम्यान, सीजेपीने संसद मोर्चाचे आयोजन केले असले तरी प्रशासनाने त्यास परवानगी नाकारली आहे. तरीही संसद मोर्चापूर्वी जंतरमंतर परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी झाली असून सुमारे २० हजारांहून अधिक आंदोलक दिल्लीत दाखल झाल्याचा दावा सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी केला आहे.


