मुंबई प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या आधारावर आधुनिक भारताची पायाभरणी केली. त्यांचे विचार आजही समताधिष्ठित, न्याय्य आणि सर्वसमावेशक भारताच्या निर्मितीसाठी तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
राज्यपाल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्बल घटकांना शिक्षण, सन्मान, समान संधी आणि न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य संघर्ष केला. शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानत त्यांनी प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी अविरत कार्य केले. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे.
समाजातील विषमता, जातीय भेदभाव, उच्च-नीचतेची मानसिकता तसेच स्त्री-पुरुष असमानता दूर करण्याचा संदेश डॉ. आंबेडकरांच्या कार्यातून मिळतो, असे सांगत राज्यपालांनी सर्वांनी मिळून समतेवर आधारित समाजव्यवस्था उभारण्याचे आवाहन केले. प्रत्येक नागरिकाला समान संधी, सन्मान आणि न्याय मिळेल, असा भारत घडविणे हीच डॉ. आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा मिळते. अशा पुरस्कारांमुळे समाजात सकारात्मक विचार, परिश्रमाची संस्कृती आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक बळकट होते, असे मतही राज्यपालांनी व्यक्त केले.
‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या राष्ट्रीय संकल्पना साकार करण्यासाठी विकास सर्वसमावेशक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि प्रख्यात उद्योजक पद्मश्री डॉ. अशोक खाडे यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रदान करण्यात येणारा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, अॅड. उज्ज्वल निकम, अॅड. बी. के. बर्वे, डॉ. वेंकट स्वामी, अरविंद सोनटक्के, सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, चंद्रशेखर कांबळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते.


