मुंबई प्रतिनिधी
मुंबईत ‘बेस्ट’ बसच्या अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच बुधवारी भांडुप पश्चिम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांची पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. रिव्हर्स घेत असताना बेस्ट बसने ४३ वर्षीय पादचाऱ्याला चिरडल्याने तो बसच्या मागील भाग आणि झाडाच्या मोठ्या कुंडीच्या मधोमध विचित्ररीत्या अडकला. उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत बसला अक्षरशः धक्का मारून पुढे ढकलले आणि जखमीला बाहेर काढले. मात्र या गोंधळात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने दोन दुचाकी आणि एका रिक्षालाही धडक दिली.
Mumbai, Maharashtra: A BEST bus accident was reported near Critical Hospital in the Konkan Nagar area of Bhandup, where the bus hit a pedestrian and several vehicles. The pedestrian sustained injuries and was admitted to a nearby hospital for treatment. Several vehicles were also… pic.twitter.com/Zsm3RylH2B
— IANS (@ians_india) July 8, 2026
‘बेस्ट’ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भांडुप पश्चिम येथील कोकण नगर परिसरात घडली. ओशिवरा डेपोतून ए-४२५/३२ मार्गावर धावणारी बस (क्रमांक ४०४७) वळण घेत असताना चालकाला वाहन योग्य प्रकारे फिरवता आले नाही. त्यामुळे त्याने बस रिव्हर्स घेतली. याच वेळी मागील बाजूने चालत जाणारे अतुल अनंत पडवे (वय ४३) यांना बसचा जोरदार धक्का बसला.
धडकेनंतर पडवे हे बसच्या मागील भाग आणि रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या झाडाच्या कुंडीच्या मधोमध अडकले. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. जखमीची अवस्था पाहून नागरिकांनी बसला हाताने धक्का देत पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पडवे यांची सुटका झाली; मात्र अचानक बस पुढे सरकल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण बिघडले आणि बस पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकी तसेच एका रिक्षावर जाऊन आदळली.
या अपघातात अतुल पडवे यांच्या दोन्ही मांड्यांना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. बस वाहकाने तातडीने त्यांना मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
घटनेनंतर ‘बेस्ट’ प्रशासनाने विशेष बस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा व प्राथमिक चौकशी सुरू केली. बस मागे घेताना चालकाने आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन केले होते का, परिसरात मार्गदर्शक कर्मचारी उपस्थित होता का, तसेच अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याचा तपास सुरू आहे. भांडुप पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या महिन्यात दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमाजवळील वीर कोतवाल उद्यान परिसरात बेस्ट बसने कार आणि दुचाकीला धडक दिल्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. त्या घटनेनंतरही बसचालकांच्या प्रशिक्षणाबाबत, सुरक्षित वाहनचालना आणि गर्दीच्या भागातील वाहतूक व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
भांडुपमधील ताज्या अपघातामुळे शहरातील गर्दीच्या भागात बेस्ट बस चालविताना अधिक दक्षता, रिव्हर्स घेताना कठोर सुरक्षा उपाययोजना आणि तांत्रिक नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.


