चंद्रपूर प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव (मारोती) हे गाव काहीच दिवसांपूर्वी प्रकाशाच्या झोतात आले. ते या गावातील शहीद झालेल्या अक्षय निकुरे यांच्या बलिदानाने. मात्र, एका वानराने दाखवलेल्या माणुसकीच्या वृत्तीने आता पुन्हा हे गाव चर्चेत आले.
विजय मारुती धवणे यांच्या मातोश्री अनुसया यांचे 75 व्या वर्षी बुधवार, 29 जानेवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्काराची तयारी करत असताना एक वानर आले. अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी होईपर्यंत ते थांबले आणि हे वानर अंत्ययात्रेसोबत स्मशानभूमीतही पोहचले.
तिरडी खाली ठेवताच वानर मृतदेहाजवळ आले. त्याने मृतदेहाच्या डोक्यावरील पदर बाजूला सारून शवाला मिठी मारली. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर त्याने अनुसयाच्या डोळ्यावरील चष्मा बाजूला केला. अनुसयाचे अंतिमसंस्कार होईपर्यंत हे वानर घटनास्थळीच थांबले होते. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर हे वानर सर्वांसोबत परतही फिरले. अनुसया आईच्या अस्थी आणतानाही ते वानर उपस्थित होते, हे विशेष. वानराच्या या वागण्यामुळे गावकरी अचंबित झाले असून, हे वानर अनुसयाच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहिल्यामुळे तिला मोक्ष प्राप्त झाला असेल, अशी गावात व नातेवाईकात चर्चा आहे.


