मुंबई प्रतिनिधी
मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या चार तासांच्या कालावधीत पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अनेक भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले, तर काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. विशेषतः मुलुंड, अंधेरी, वर्सोवा, पवई, मानखुर्द आणि ओशिवरा परिसरात जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारीनुसार, पूर्व उपनगरातील मुलुंड येथील वीणा नगरमध्ये सर्वाधिक १६०.४ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरातील वर्सोवा येथे १५६.८ मिमी पाऊस झाला. या दोन्ही भागांमध्ये पावसाचा जोर अत्यंत तीव्र असल्याचे स्पष्ट झाले.
मध्यरात्रीपासून पहाटे चार वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुलुंडमधील एलबीएस मार्गावरील काही भागांत पाणी साचले. तसेच अंधेरी सबवेही काही काळ जलमय झाल्याने वाहनांची वाहतूक मंदावली. काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, महापालिकेच्या यंत्रणांनी तातडीने पाणी उपसण्याचे काम हाती घेतले.
पूर्व उपनगरांमध्ये मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर महानगरपालिका शाळेत १२३.४ मिमी, पवईतील पासपोली महानगरपालिका शाळेत १२२ मिमी, मुलुंडमधील मिठागर महानगरपालिका शाळेत १२०.८ मिमी आणि ‘एस’ विभागीय कार्यालय परिसरात १२०.६ मिमी पावसाची नोंद झाली. या भागांमध्ये अनेक सखल ठिकाणी पाणी साचल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पश्चिम उपनगरांमध्ये वर्सोवा पंपिंग स्टेशन परिसरात १२१.६ मिमी पाऊस झाला. याशिवाय मरोळ अग्निशमन केंद्रात १०८.४ मिमी, ओशिवरा येथील प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळेत १०८ मिमी, तर अंधेरीतील माल्पा डोंगरी महानगरपालिका शाळेत १०४ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा सर्वाधिक फटका अंधेरी, वर्सोवा आणि परिसरातील सखल भागांना बसला.
दरम्यान, दक्षिण मुंबईत तुलनेने मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. माटुंगा येथे ५३.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल रावली कॅम्प येथे ४६.७२ मिमी, दादर अग्निशमन केंद्रात ४५.६ मिमी, मलबार हिल येथे ३७.२ मिमी, तर नायर रुग्णालय परिसरात ३३.७७ मिमी पाऊस झाला.
महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


