मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे पश्चिम येथील शेर्ली राजन रोडवरील ‘अटलांटिक’ इमारतीच्या सातव्या मजल्यावर बुधवारी रात्री भीषण आग लागून ६४ वर्षीय अझीम बारोडावाला यांचा मृत्यू झाला, तर धुरामुळे गुदमरल्याने दोन अग्निशामक जवान जखमी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले.
मुंबई अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, रात्री ९.१२ वाजता आगीची माहिती मिळाल्यानंतर तातडीने जवान, स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि पालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने रात्री ९.५५ वाजता तिला ‘लेव्हल-१’ घोषित करण्यात आले. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री ११.५० वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.
आग इमारतीच्या सातव्या मजल्यावरील ७०१ आणि ७०२ क्रमांकाच्या सदनिकांमध्ये पसरली होती. या आगीत विद्युत वायरिंग, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि घरातील अन्य साहित्य जळून खाक झाले. काही नागरिक अडकल्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशामक दलाने तातडीने शोध व बचाव मोहीम हाती घेतली.
या दरम्यान, गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळलेले अझीम बारोडावाला यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बचावकार्यात सहभागी असलेले वांद्रे अग्निशामक केंद्राचे जवान शिवशंकर भारत पुरी (३२) आणि नवनाथ मोहन बिटे (३४) हे धुरामुळे गुदमरल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आगीच्या प्रचंड ज्वाला परिसरातील इतर उंच इमारतींमधूनही दिसत असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग इतर मजल्यांवर आणि शेजारच्या इमारतींमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.


