अंबरनाथ : प्रतिनिधी
लग्नानंतर अवघ्या ४८ दिवसांत २६ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ येथे घडली आहे. पतीकडून सतत संशय, मानसिक व शारीरिक छळ, घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून हालचालींवर नजर ठेवणे, तसेच हुंड्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी डॉक्टर पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मृत महिलेचे नाव विशाखा तिळकर (वय २६) असून त्या मूळच्या पुण्यातील आहेत. त्यांचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले होते. ३० एप्रिल रोजी अंबरनाथ येथील डॉ. नितीन तिळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर लगेचच सासरच्या मंडळींकडून ५० ग्रॅम सोने आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. महागड्या भेटवस्तू न आणल्याबद्दल वारंवार टोमणे मारले जात होते. तसेच विशाखा यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्यावर सतत मानसिक दबाव निर्माण केला जात होता.
विशाखा यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यांना शेजाऱ्यांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
रविवारी शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी संवाद साधल्यानंतर घरात वाद झाला. त्यानंतर डॉ. नितीन यांनी विशाखा यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीनंतर विशाखा यांनी आपल्या आई-वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर पुण्यातील कुटुंबीय अंबरनाथला येऊन चर्चा करण्याच्या तयारीत असतानाच मंगळवारी विशाखा यांनी आत्महत्या केली.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नितीन तिळकर, सासू छाया तिळकर आणि दीराविरुद्ध हुंडाबळी प्रतिबंधक कायदा, छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


