रणजित मस्के,प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी खाकी वर्दीतील पोलीस काका आणि पोलीस दिदी शाळांमध्ये पोहोचल्याने जिल्हाभरात एक भावनिक आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. एरवी पोलिसांना पाहून दुरून राहणारी चिमुकली मुले आज त्यांच्याशी हसत-खेळत संवाद साधताना दिसली.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून शाळा प्रवेशोत्सव-२०२६ निमित्त संपूर्ण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील ५०८ शाळांमध्ये ६० पोलीस अधिकारी आणि ४०४ पोलीस अंमलदारांनी भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले.
प्रकाश जाधव यांनी स्वतः जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, लाडगाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या सुप्त गुणांचे कौतुक केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्त्व खेळकर पद्धतीने समजावून सांगण्यात आले. पोलीस हे केवळ गुन्हेगारांसाठी कठोर असतात, तर चांगल्या आणि प्रामाणिक मुलांचे ते कायमचे मित्र असतात, असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्यात आला. रस्त्यात अडचण आल्यास, पत्ता हरवल्यास किंवा कोणी त्रास दिल्यास तातडीने पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांकडून डायल ११२ आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ हे क्रमांक तोंडपाठ करून घेण्यात आले. तसेच अनोळखी व्यक्तींकडून चॉकलेट, बिस्किटे, खेळणी किंवा इतर वस्तू स्वीकारू नयेत, तसेच पालकांनी पाठविल्याचे सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीसोबत अजिबात जाऊ नये, असे महत्त्वाचे धडे देण्यात आले.
मुलांमध्ये वाढत असलेल्या मोबाईलच्या व्यसनाबाबतही जनजागृती करण्यात आली. मोबाईलचा अतिवापर, ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडियाच्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगत सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इंटरनेटवरील अनोळखी व्यक्तींशी मैत्री करू नये आणि वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.
‘पोलीस काका व पोलीस दिदी’ हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर करून विश्वास, मैत्री आणि सुरक्षिततेचे नाते निर्माण करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून पोलीस दलाचे कौतुक करण्यात आले असून, खाकी वर्दीचा एक संवेदनशील आणि आपुलकीचा चेहरा समाजासमोर आला आहे.


