मुंबई प्रतिनिधी
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल सेवा आज सकाळी अचानक ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. चेंबूर स्थानकाजवळ ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वर बाह्य तार अडकल्याने सकाळी ९.१६ वाजल्यापासून अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
Train Update:
Train services on the Up and Down Harbour Line have been halted since 09:16 hrs due to a wire hanging on the OHE.
Restoration work is in progress, and all efforts are being made to resume services at the earliest possible time.
We regret the inconvenience caused…— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) June 12, 2026
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९.१० वाजता चेंबूर परिसरात ओव्हरहेड वायरवर बाह्य तार पडल्याचे निदर्शनास आले. सुरक्षिततेच्या कारणास्तव हार्बर मार्गावरील दोन्ही दिशांतील लोकल सेवा तातडीने थांबविण्यात आली. त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
सेवा बंद झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी बस, टॅक्सी आणि रिक्षांचा पर्याय निवडला. परिणामी काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक स्थानकांवर लोकलची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची गर्दी उसळली होती.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. ओव्हरहेड वायरवर अडकलेली तार हटवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. अखेर सकाळी ९.५२ वाजता हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात रेल्वेला यश आले.
दरम्यान, सुमारे ४० मिनिटे सेवा बंद राहिल्याने हार्बर मार्गावरील अनेक लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे उपनगरीय रेल्वे सेवेबाबत प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


