पुणे प्रतिनिधी
देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि प्रवेश परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांविरोधात कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केली आहे. तसेच सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशव्यापी जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
वीडियो । पुणे, महाराष्ट्र: कॉकरोच जनता पार्टी (CJP) के संस्थापक अभिजीत दिपके ने कहा, “हम सभी ने दिल्ली के जंतर-मंतर पर हुए प्रदर्शन को देखा, जहां हमारे शांतिपूर्ण आंदोलन को जबरदस्त समर्थन मिला और पूरा स्थल लोगों से भर गया था। इससे साबित हो गया कि इस देश के युवा अब सरकार से डरने… pic.twitter.com/Qfor6F17Gk
— पीटीआई न्यूज_भाषा (@PTINews_Bhasha) June 10, 2026
पुण्यातील पत्रकार भवन येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दीपके बोलत होते. यावेळी त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, पेपरफुटी, निकालांमधील त्रुटी आणि भरती प्रक्रियेत होत असलेल्या अनियमिततेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. देशातील लाखो विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थी आपल्या भवितव्यासाठी अथक परिश्रम घेत असताना व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे त्यांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दीपके म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आणि भरती प्रक्रियांभोवती वाद निर्माण होत आहेत. SSC GD, CBSE, NEET तसेच इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने गैरव्यवहार, पेपरफुटी आणि निकालांबाबत तक्रारी समोर येत आहेत. या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास ढासळत असून लाखो युवक मानसिक, आर्थिक आणि सामाजिक तणावाचा सामना करत आहेत.
“देशातील तरुण वर्ग आपले भविष्य घडविण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतो. मात्र परीक्षा व्यवस्थेतील चुका आणि गैरव्यवहारांमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरत आहे. ही केवळ प्रशासकीय चूक नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे,” असे दीपके यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याकडून किरकोळ चूक झाली तरी त्याच्यावर तात्काळ कारवाई होते. मात्र लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित होताना दिसत नाही. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची माहिती देताना दीपके म्हणाले की, ६ जून रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला आहे. त्यानंतर ११ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले असून हा आंदोलन मोहिमेचा दुसरा टप्पा असेल. या आंदोलनात विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षार्थी आणि युवक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
“एका व्यक्तीचा आवाज दाबता येऊ शकतो; मात्र लाखो विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे शक्य नाही. ही लढाई कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून विद्यार्थ्यांच्या न्याय आणि भवितव्यासाठी आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असेही ते म्हणाले.
पुण्यातील आंदोलनानंतर लखनौ, जयपूर, अमृतसर आणि देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही आंदोलनांची मालिका राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, CJP च्या या भूमिकेमुळे परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ११ जून रोजी पुण्यात होणाऱ्या आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्राचे विशेष लक्ष लागले असून या आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडेही राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळांचे लक्ष राहणार आहे.


