पुणे प्रतिनिधी
नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना काँक्रोज जनता पार्टीने आता महाराष्ट्रात आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनाची घोषणा केली असून, यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर मराठीतून पोस्ट करत कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
भेटूया पुण्यात! जय महाराष्ट्र! https://t.co/3L3IUarDUF
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) June 8, 2026
यापूर्वी शनिवारी राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँक्रोज जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे अभिजित दिपके आणि त्यांच्या पक्षाची देशभरातील राजकीय वर्तुळात तसेच प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली होती. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित करत पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली होती.
दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजित दिपके यांनी अशा प्रकारची आंदोलने देशातील विविध राज्यांमध्ये करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आता महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवार, ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात हे आंदोलन होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
या आंदोलनासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करताना अभिजित दिपके यांनी, “भेटूया पुण्यात! जय महाराष्ट्र!” असा संदेश दिला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये आंदोलनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँक्रोज जनता पार्टीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी करणे आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी करणे हा आंदोलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी देशभरात विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर पुण्यात होणाऱ्या या आंदोलनाकडे राज्यातील विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


