मुंबई प्रतिनिधी
सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे.
ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (8 जून) येथे दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी, व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना, अजित बारोडिया तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरदाना यांनी यावेळी प्रकल्पाचे सादरीकरण केले.
मुख्यमंत्री म्हणाले, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ इमारती उभारण्याचा कार्यक्रम नसून धारावीकरांच्या सर्वांगीण विकासाचा उपक्रम आहे. त्यामुळे धारावी येथे राहणारे नागरिकच या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत. धारावीतील संपूर्ण औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्था (इकोसिस्टम) कायम ठेवण्यात यावी. व्यावसायिक विकास हा या प्रकल्पाचा एक भाग असला तरी लोकहितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. हा प्रकल्प नागरिकांच्या हितासाठी राबविला जात असल्याने त्यांच्या रोजगार व उपजीविकेचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून पहिल्या टप्प्यात 2028 पर्यंत किमान 10 हजार घरे नागरिकांना देण्याचे नियोजन करावे. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व परवाने एकाच ठिकाणी व जलदगतीने मिळावेत, यासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात यावा. यासाठीची प्रक्रिया रिइंजिनिरिंग करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन मुंबईला जागतिक दर्जाची नवी ओळख मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
धारावीत देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या केंद्रात विमान प्रवाशांसाठी ‘सिटी चेक-इन’ सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवासी धारावीतच सामानाची नोंदणी करून नंतर एअरपोर्ट एक्सप्रेसच्या माध्यमातून विमानतळावर पोहोचू शकतील. सिंगापूर आणि हॉंगकॉंगप्रमाणे जागतिक दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे सादरीकरणात सांगण्यात आले.
याशिवाय विमानतळापर्यंत जलवाहतुकीसाठी फास्ट जेट्टी उभारण्यात येणार असून भविष्यातील हवाई टॅक्सी सेवांचा विचार करून व्हर्टीपोर्टही विकसित केला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे, मेट्रो, रस्ता, जलमार्ग आणि हवाई वाहतूक अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.


