स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
कणकवली: पाच वर्षांपूर्वी फोंडाघाटात अपघाताचा बनाव करून ज्या तरुणाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता तो प्रत्यक्षात अपघात नसून थंड डोक्याने केलेला खून असल्याचे उघड झाले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने या प्रकरणाचा तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्याने हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. पैशांच्या वादातून अश्पाक मुलाणी उर्फ निहाल याचा त्याच्याच मित्रपरिवाराने निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये फोंडाघाटातील खोल दरीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आणि जवळच त्याची मोटारसायकल आढळून आली होती. रस्ते अपघातामध्ये हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करत कणकवली पोलिसांनी त्या वेळी अपघाताची नोंद करून तपास थांबवला होता. मात्र पाच वर्षांनंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली. घाटकोपर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांना या खुनाबाबतची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाची मदत घेत संशयितांची चौकशी सुरू केली. या चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केल्यामुळे घाटकोपर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार माळशिरस येथील रहिवासी असलेला अश्पाक मुलाणी आणि त्याचे मित्र यांच्यात पैशांची मोठी देवाणघेवाण होती. या आर्थिक वादातून संशयित मनोज भडगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिष मोरे, अमित राऊत, अनिल भंडारी आणि ऋतुराज शेट्टी यांनी अश्पाक याला कुडाळमधील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वांनी मिळून अश्पाकला जबर मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी अश्पाकचा मृतदेह आणि त्याची मोटारसायकल फोंडाघाटातील दरीत फेकून दिली आणि संपूर्ण घटनेला रस्ते अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.
या गुन्ह्यात सहभागी असलेल्या मनोज भडगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिष मोरे आणि ऋतुराज शेट्टी या चौघांना मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे सर्व आरोपी आता कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त अनिल कुंभारे, अपर आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणातील इतर दोन संशयित अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आता कणकवली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यातील अधिक माहिती लवकरच समोर येईल.


