वांद्रे विशेष प्रतिनिधी
मुंबई: ‘घाटकोपर दुर्घटनेतून प्रशासनाने काहीच बोध घेतलेला नाही का?’ असा सवाल करत खार (पूर्व) येथील जय हिंद नगर परिसरात उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत महाकाय होर्डिंगवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या होर्डिंगविरोधात वारंवार लेखी तक्रार करूनही मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने, आता हे प्रकरण न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत.
खार (पूर्व) मधील सर्व्हिस रोडजवळ आणि निवासी वस्तीच्या अगदी जवळ हे महाकाय होर्डिंग उभे करण्यात आले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना या होर्डिंगमुळे मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या गंभीर धोक्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या भूमिकेवर तक्रारदार अँड. रोशनी सोनी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

“घाटकोपरसारखी दुर्घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा, संभाव्य धोका टाळणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवितहानीला निमंत्रण देण्यासारखे आहे,” असे मत स्थानिकांनी व्यक्त केले. या प्रकरणाची दखल घेत महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि संबंधित विभागाला कडक कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. आता पालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारते की हे प्रकरण न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचते, याकडे खारकरकरांचे लक्ष लागले आहे.


